मिडास हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालणाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:14 AM2018-05-30T00:14:30+5:302018-05-30T00:15:03+5:30
मिडास हॉस्पिटलमध्ये १० एप्रिल २०१८ रोजी मृत पावलेल्या एका १८ वर्षीय तरुणाच्या मृत्यूप्रकरणी गोंधळ घालणाऱ्या जमावाविरुद्ध फौजदारी आणि महाराष्ट्र मेडिकेअर सर्व्हिस, व्यक्ती व मेडिकेअर संस्था-२०१० या कायद्याच्या कलम १४३, १४७, १४९, ४२७ अन्वये बजाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मिडास हॉस्पिटलमध्ये १० एप्रिल २०१८ रोजी मृत पावलेल्या एका १८ वर्षीय तरुणाच्या मृत्यूप्रकरणी गोंधळ घालणाऱ्या जमावाविरुद्ध फौजदारी आणि महाराष्ट्र मेडिकेअर सर्व्हिस, व्यक्ती व मेडिकेअर संस्था-२०१० या कायद्याच्या कलम १४३, १४७, १४९, ४२७ अन्वये बजाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतदेह आणि मृत्यूचा दाखला नातेवाईकांकडे सोपविल्यानंतरही त्यांनी हॉस्पिटलचे बिल भरले नव्हते. तरुणाच्या मृत्यूनंतर अर्धा तासातच ३०० लोकांच्या जमावाने हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालण्यास सुरुवात केली. जमावाने गोंधळ घातल्यानंतर लगतच्या हॉस्पिटलमधील डॉक्टर्स मिडासमध्ये गोळा झाले होते. गोंधळ घालून हॉस्पिटलची तोडफोड आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या चार जणांची पोलिसांना ओळख पटली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अन्यची ओळख पटविण्यात येत आहे.
२०१० च्या कायद्यांतर्गत नोंदविलेला गुन्हा दखलपात्र आणि गैरजमानत ठरतो. या गुन्ह्यात तीन वर्षे शिक्षा आणि ५० हजार रुपये दंडाची तरतूद आहे. याशिवाय नातेवाईक वा रुग्णाला दुप्पट नुकसान भरपाई द्यावी लागते.
या प्रकरणी विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनने (व्हीएचए) पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पोलीस उपायुक्त (झोन-१) कृष्णकांत उपाध्याय आणि बजाजनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील यांची भेट घेऊन मिडास हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. श्रीकांत मुकेवार यांनी नोंदविलेल्या तक्रारीच्या आधारे गोंधळ घालणाऱ्या जमावाविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची विनंती केली. या प्रकरणाचा मुख्यमंत्री कार्यालयाने पाठपुरावा केला. तातडीने कारवाई केल्याबद्दल विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनने मुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्तांचे आभार मानले आहे.