एमआयडीसीतील हत्याकांडाचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:07 AM2021-05-17T04:07:29+5:302021-05-17T04:07:29+5:30

नातीनेच केला घात : चौघांना अटक, दोन फरार लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी पहाटे ...

MIDC massacre exposed | एमआयडीसीतील हत्याकांडाचा पर्दाफाश

एमआयडीसीतील हत्याकांडाचा पर्दाफाश

Next

नातीनेच केला घात : चौघांना अटक, दोन फरार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी पहाटे झालेल्या विजयाबाई पांडुरंगजी तिवलकर (वय ६५) यांच्या हत्येचा पोलिसांनी अखेर पर्दाफाश केला. विशेष म्हणजे, विजयाबाई यांची हत्या त्यांच्या नातीनेच करवून घेतल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी नीलेश प्रकाश पौनीकर (वय १८, रा न्यू मंगळवारी), कादिर उर्फ बाबा खान ( वय १८, रा. गुलशन नगर), फरदिन खान (वय २२, रा. यादव नगर) आणि आरजू उर्फ माेहम्मद कमर आलम (वय २०, रा. वनदेवी नगर) या चौघांना अटक केली. तर मुख्य सूत्रधार मृत विजयाबाईची नात मिनू (काल्पनिक नाव) आणि तिचा प्रियकर फरार आहे.

विजयाबाई एसआरपीएफच्या निवृत्त कर्मचारी होत्या. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली असून तिघांचेही लग्न झाले आहे. हे तिघेही नागपुरातच वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या परिवारासह राहतात. वृद्ध विजयाबाई यांनी निवृत्तीनंतर सप्तक नगरात घर बांधले. तेथे त्या एकट्याच राहायच्या. अधूनमधून मुलीची मुलगी मिनू त्यांच्याकडे यायची. आजीकडे १० ते १५ लाख रुपये आणि दागिने असल्याचा अंदाज मिनूने बांधला होता. तिने तिच्या प्रियकराला ते सांगितले होते. आजीकडची रोकड आणि दागिने लुटल्यास आपल्याला ऐशोआरामात जीवन जगता येईल, असा अंदाज बांधून मिनू तिचा मित्र फैजान तसेच त्याचे साथीदार बाबा, नीलेश, फरदीन यांनी बांधला. लूटमार करताना आजीने विरोध केल्यास तिची हत्या करण्याचाही कट त्यांनी रचला.

अशी घडली घटना

गुरुवारी रात्री मिनू आजीच्या घरी आली. जेवण वगैरे केल्यानंतर मध्यरात्री तिने आपल्या प्रियकर फैजानला फोन केला. यावेळी फैजान आणि त्याचे चार साथीदार त्याच भागात घुटमळत होते. मिनूच्या मदतीने ते सर्व विजयाबाई यांच्या घरात शिरले. त्यांच्या आवाजाने विजयाबाईना जाग आली. त्यांनी विरोध करताच आरोपींनी त्यांचे हातपाय धरून त्यांच्या तोंडावर उशी दाबली. विजयाबाई तशाही स्थितीत प्रतिकार करत असल्याने आरोपींनी त्यांच्या गळ्यावर गुप्तीचे घाव घालून त्यांची हत्या केली. घरातील रोकड आणि सोन्याचे दागिने लुटून आरोपी पळून गेले.

---

असा मिळाला धागा

विजयाबाई यांची हत्या झाल्याचे शुक्रवारी दुपारी उघड झाल्यानंतर ठाणेदार युवराज हांडे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. आजूबाजूला सीसीटीव्ही किंवा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याने पोलिसांची अडचण झाली होती. ती लक्षात घेऊन खुद्द पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. दिलीप झळके, उपायुक्त विवेक मासाळ यांनी तपासावर लक्ष केंद्रित केले. दोन डझनांपेक्षा जास्त व्यक्तींची कसून चौकशी केली. त्यात विजयाबाई यांच्या नातेवाईकांचाही समावेश होता. त्यांच्या चौकशीतूनच मिनूचे नाव पुढे आले आणि नंतर पोलिसांनी धागे-दोरे जुळवले. कळमना परिसरात शनिवारी रात्री बाबा, नीलेश पौनिकर आणि फरदीन खान या तिघांना अटक केली. रविवारी सायंकाळी आरजूला पकडण्यात आले.

---

रोकड, दागिन्यांसह मिनू फरार

या हत्याकांडाची सूत्रधार विजयाबाई यांची नात मिनू तिच्या प्रियकरासोबत फरार असून तिच्याकडे लुटलेले २३ हजार तसेच दागिने असल्याचे समजते. ते अमरावती, बुलडाणा मार्गे औरंगाबादकडे गेल्याचा अंदाज असून, आम्ही त्यांनाही लवकरच अटक करू, असा विश्वास पोलीस अधिकारी व्यक्त करीत आहेत.

--

Web Title: MIDC massacre exposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.