मिडनाईट इवेथन : नागपुरात उत्तररात्री पोलीस धावले रस्त्यावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 12:14 AM2020-02-01T00:14:59+5:302020-02-01T00:15:49+5:30
महिला सुरक्षेची भावना सर्वसामान्यांमध्ये निर्माण व्हावी, या उद्देशाने पोलीस अधिकारी व कर्मचारी शुक्रवारी उत्तररात्री रस्त्यावर एकसाथ उतरले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या काही काळापासून नागपूर पोलीस विविध उपक्रमांमुळे चर्चेत आहेत, लोकप्रियही होत आहेत. महिला सुरक्षेसंदर्भात चालविलेल्या विविध उपाययोजनांमुळे, त्यांची स्तुतीही केली जात आहे. त्याच शृंखलेत शुक्रवारी उत्तररात्री संपूर्ण पोलीस कर्मचारी रस्त्यावर धावताना दिसत होते. धावण्याचे कारण म्हणजे ‘मिडनाईट इवेथन’चे आयोजन होते.
महिला सुरक्षेची भावना सर्वसामान्यांमध्ये निर्माण व्हावी, या उद्देशाने पोलीस अधिकारी व कर्मचारी शुक्रवारी उत्तररात्री रस्त्यावर एकसाथ उतरले होते. महिलासुरक्षेसंदर्भात नागपूर पोलीस गंभीर असून, महिलांसाठीच्या ‘होम ड्रॉप’ सुविधेने देशभरात लोकप्रियताही मिळवली आहे. त्याच अनुषंगाने नवा पुढाकार म्हणून ‘मिडनाईट इवेथन’चे आयोजन करण्यात आले होते. यात दहा-दहा किमी दौड, सायकलिंग आणि पाच किमी वॉकिंगचा समावेश होता. सिव्हील लाईन्स येथील पोलीस जिमखाना येथून ही दौड सुरू झाली. सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम व अपर आयुक्त बी.जी. गायकर यांनी हिरवी झेंडी दाखवून दौडचा शुभारंभ गेला. विशेष म्हणजे बी.जी. गायकर शुक्रवारीच सेवानिवृत्त झाले. ही ‘मिडनाईट इवेथन’ जिमखाना येथून सेंट्राल एव्हेन्यू, अग्रसेन चौक आणि पुन्हा त्याच मार्गाने पोलीस जिमखाना येथे पोहोचली. पोलीस विभागाचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी रात्री उशिरा रस्त्यावर बघून नागरिकांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी पोलिसांच्या या उपक्रमांची प्रशंसाही केली.