मोमीनपुऱ्यात गुन्हेगारांकडून मध्यरात्री ‘फायरिंग’; कट मारण्याच्या वादातून घडली घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2023 07:48 PM2023-03-24T19:48:00+5:302023-03-24T19:48:23+5:30
Nagpur News वाहनाला कट लागल्याच्या किरकोळ वादातून मोमीनपुरा परिसरातील एका पानठेला संचालकावर गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी गोळीबार केला. गुरुवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेत नेम चुकल्याने तरुण बचावला.
नागपूर : वाहनाला कट लागल्याच्या किरकोळ वादातून मोमीनपुरा परिसरातील एका पानठेला संचालकावर गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी गोळीबार केला. गुरुवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेत नेम चुकल्याने तरुण बचावला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी या प्रकरणात मुख्य सूत्रधारासह दोघांना अटक केली असून दोन जण फरार आहेत.
पोलिसांनी आनंद सुदेश ठाकूर (मानेवाडा मार्ग) व रवी लांजेवार (शिवशक्ती नगर, उमरेड मार्ग) यांना अटक केली असून प्रणय चांडक (सीताबर्डी) व समीर बुलबुले (सक्करदरा) हे फरार आहेत. आनंद हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नासह विविध गुन्हे दाखल आहे. त्याचे इतर सहकारीदेखील गुन्हेगारी प्रवृत्तीचेच आहेत. गुरुवारी रात्री ११.३० च्या सुमारास चौघेही मोमीनपुरा येथे कारमधून आले होते. मोमीनपुरा येथे काही काळ घालवून परत येत असताना, नईम पान स्टॉलसमोर कट लागल्याच्या कारणावरून त्यांचा शहाबुद्दीन आणि पापा या दुचाकीस्वारांशी वाद झाला. चौघेही जण गाडीतून उतरले व ते पाहून पानठेला संचालक नईम अख्तरसह काही लोक बचावासाठी समोर आले व त्यांनी आरोपींना घेरले. हे पाहून आरोपी तेथून निघून गेले. त्यानंतर ते बारमध्ये गेले. तेथे त्यांनी वाद घालणाऱ्यांना धडा शिकविण्याचे ठरविले व दारू पिऊन परत मोमीनपुऱ्याच्या दिशेने निघाले.
रात्री दोन वाजता गुन्हेगार नईमच्या पानठेल्यासमोर आले व त्यांनी शहाबुद्दीन आणि त्याच्याशी वाद झालेल्या तरुणांचा शोध सुरू केला. दरम्यान, नईमला पाहताच आनंद ठाकूरने हवेत पहिली गोळी झाडली तर दुसरी गोळी नईमवर झाडली, पण नेम चुकल्याने ती गोळी टपरीला लागली. गोळीबाराचा आवाज ऐकून मोमीनपुरा परिसरात एकच खळबळ उडाली. कारमध्ये बसून गुन्हेगार पळून गेले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. कारच्या क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू करत आनंद ठाकूर आणि रवी लांजेवार यांना ताब्यात घेतले.