अहमदाबाद हावडा एक्सप्रेसवर मध्यरात्री दगडफेक? गाडी कामठी स्थानकाजवळ थांबवली!
By नरेश डोंगरे | Published: September 20, 2024 11:39 PM2024-09-20T23:39:54+5:302024-09-20T23:40:35+5:30
प्रशासनाकडून इन्कार, खालची गिट्टी उडाल्याचे उत्तर
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: अहमदाबाद हावडा एक्सप्रेसवर गुरुवारी मध्यरात्री समाजकंटकांनी दगडफेक केल्याची जोरदार चर्चा पसरली होती. यामुळे ही गाडी सुमारे १५ मिनिट कामठीनजिकच्या रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आल्याचेही वृत्त होते. रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) मात्र या घटनेचा ईन्कार केला असून, दगडफेकीची घटना घडली नाही तर ट्रॅकवर असलेली गिट्टी उसळल्याने गैरसमज झाल्याचे अधिकारी म्हणाले.
नेहमीप्रमाणे गुरुवारी मध्यरात्रीच्या दरम्यान अहमदाबाद हावडा एक्सप्रेस नागपूर रेेल्वे स्थानकावरून पुढच्या प्रवासाला मार्गस्थ झाली. कामठीकडे जात असताना कॅम्प परिसराच्या लाईनवर गाडीच्या इंजिवर तसेच बाजुच्या डब्याच्या खिडकीवर गिट्टीसारखे दगड आल्यासारखा भास झाला. त्यामुळे एकच उडाला. लोको पायलटने घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन काही अंतरावर तिरोडी स्थानकाजवळ गाडी थांबविली. रेल्वे कंट्रोल रूमला ही माहिती देण्यात आली. त्यानंतर कामठी तसेच नागपूरचे रेल्वे पोलीस (जीआरपी) आणि आरपीएफचा ताफा तिकडे धावला. ट्रेनच्या ड्रायव्हर, मॅनेजर तसेच अन्य काहींना विचारपूस करण्यात आली. रात्रीची वेळ असल्याने कुणी दगड भिरकावताना दिसला नाही. मात्र गाडीवर गिट्टीसारखे दगड आल्याचे स्पष्ट झाले.
सुरक्षेची खात्री केल्यानंतर गाडी पुढच्या प्रवासासाठी रवाना करण्यात आली. त्यानंतर जीआरपी आरपीएफने बरीच शोधाशोध केली. शेवटी रुळवार गिट्टी आली असावी आणि ती चाकात सापडून वर उडाली असावी, असा निष्कर्ष आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी काढला.
दरम्यान, या घटनेसंबंधाने सोशल मिडियावर उलटसुलट वृत्त व्हायरल झाले. त्यामुळे रात्रीच अनेकांनी आरपीएफ, जीआरपी तसेच रेल्वे कंट्रोल रूमकडे विचारणा केली. कुठलीही ठोस माहिती मिळत नसल्याने पहाटे २ वाजेपर्यंत या संबंधाने गोंधळ होता. आज सकाळी मात्र आरपीएफचे सुरक्षा आयुक्त दीपचंद आर्य घटनेचा ईन्कार केला. दगडफेकीची घटना घडलीच नाही, असे ठोसपणे त्यांनी सांगितले.
त्या घटनेची आठवण
वर्षभरापूर्वी वंदे भारत एक्सप्रेसवर कन्हानजवळ दगडफेक करण्यात आली होती. त्या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेत आरोपींना शोधून काढले होते. त्यांच्यावर रेल्वे अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. एवढेच नव्हे तर त्या घटनेनंतर आरपीएफकडून रेल्वे लाईनच्या बाजुला राहणाऱ्या वस्त्यांमधील, गावांतील नागरिकांचे समुपदेशनही करण्याची मोहिमही रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात आली होती. या घटनेमुळे शुक्रवारी सकाळपासून अनेकांना 'त्या' घटनेची आठवण झाली.