प्रवेशाच्या मागणीसाठी मध्यरात्री विद्यार्थी विद्यापीठात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 01:50 AM2018-09-16T01:50:53+5:302018-09-16T01:52:43+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ फेरमूल्यांकनाच्या मुद्द्यावरून वातावरण तापले आहे. फेरमूल्यांकनामध्ये उत्तीर्ण होऊन देखील विद्यापीठाने अभियांत्रिकीच्या काही विद्यार्थ्यांना मुदत संपल्याचे कारण देत प्रवेश नाकारले. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या मागणीसाठी शनिवारी सायंकाळी सुरू केलेले आंदोलन मध्यरात्री एक नंतरदेखील सुरू आहे. जोपर्यंत आम्हाला प्रवेश मिळत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
नागपूर विद्यापीठात फेरमूल्यांकनावरून होणारे आंदोलन संपल्यातच जमा होते. मात्र फेरमूल्यांकनात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुदत संपल्याचे कारण समोर करून प्रशासनाने प्रवेश नाकारला अन् फेरमूल्यांकनावरून बऱ्याच कालावधीने विद्यापीठात आंदोलन झाले. विशेष म्हणजे विरुद्ध विचारधारा असलेल्या एनएसयूआय व अभाविप या संघटना या मुद्यावरून एकत्र आल्या. 'एनएसयूआय'चे कार्यकर्ते व विद्यार्थी रात्री एक नंतरदेखील विद्यापीठातच होते.
नागपूर विद्यापीठात प्रवेशाची अंतिम तारीख ६ आॅगस्ट होती. त्यानंतर विद्यापीठाने त्याला एक महिना मुदतवाढ दिली. नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठीच ही प्रवेशाची मुदत असेल. फेरमूल्यांकनात उत्तीर्ण होणाºयांना अटींसह प्रवेश घेता येईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले होते. अभियांत्रिकीच्या फेरमूल्यांकनाचा निकाल १२ सप्टेंबर रोजी जाहीर झाला. विद्यार्थी पुढील वषार्साठी आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी गेले असता, त्यांना नकार देण्यात आला. प्रवेशाची मुदत उलटून गेली असल्याचे कारण त्यांना सांगण्यात आले.
यानंतर अभाविप व एनएसयूआयचे कार्यकर्ते विद्यार्थ्यांसमवेत शनिवारी सायंकाळी विद्यापीठात धडकले. फेरमूल्यांकनात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्या, अशी मागणी करत जोरदार घोषणाबाजी सुरू करण्यात आली. सुरक्षारक्षकांनी तातडीने पावले उचलत विद्यापीठाचे सर्व दरवाजे बंद केले. सायंकाळी ६ नंतर शिष्टमंडळाने कुलगुरूंची भेट घेतली. मात्र कुलगुरु डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनीदेखील नियमांचा हवाला देत विद्यार्थ्यांना दिलासा देण्यास नकार दिला.
विद्यापीठात नियमांचेच पालन : कुलगुरू
विद्यार्थी संघटनांनी आपले म्हणणे मांडल्यानंतर कुलगुरुंनी त्यांना दिलासा देण्यास नाकारले. प्रवेशाची अंतिम तिथी निघून गेली आहे. त्यामुळे आता प्रवेश देता येणार नाही. जर या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला तर पुढे लागणाºया फेरमूल्यांकन निकालानंतरदेखील प्रवेश द्यावा लागेल. असे झाले तर नियमानुसार ९० दिवसांचे शैक्षणिक सत्र पूर्ण होऊ शकणार नाही. त्यामुळे परीक्षेचे आयोजन करताना अडचणी येतील. विद्यापीठात नियमांचेच पालन करण्यात येईल, असे डॉ. काणे यांनी स्पष्ट केले.