गुळवेल ठरू शकते लिव्हरसाठी घातक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:10 AM2021-08-23T04:10:39+5:302021-08-23T04:10:39+5:30
नागपूर : आयुर्वेदिक औषधींमुळे शरीराला काही नुकसान पाेहोचत नाही, अशी जुनी मान्यता राहिली आहे. मात्र, काेराेना काळात वापरण्यात आलेल्या ...
नागपूर : आयुर्वेदिक औषधींमुळे शरीराला काही नुकसान पाेहोचत नाही, अशी जुनी मान्यता राहिली आहे. मात्र, काेराेना काळात वापरण्यात आलेल्या अनेक औषधांच्या विपरीत परिणामांमुळे ही मान्यता फाेल ठरली आहे. राेगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी माेठ्या प्रमाणात उपयाेगात आलेले गिलाेय (गुळवेल) औषध यकृतासाठी हानिकारक ठरल्याच्या अनेक तक्रारी समाेर आल्या आहेत.
शहरातील गॅस्ट्राेइंट्राेलाॅजिस्ट डाॅ. श्रीकांत मुकेवार आणि डाॅ. साैरभ मुकेवार यांनी सांगितले की, डिसेंबर २०२० ते जून २०२१ यादरम्यान पाच रुग्ण असे आढळून आले, ज्यांनी राेगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी गुळवेलचे सेवन केले व नंतर त्यांना कावीळची लागण झाली व गंभीर अवस्थेत रुग्णालयात भरती करावे लागले. डाॅ. मुकेवार यांनी सांगितले की, गुळवेल सेवनाने काविळ झालेल्या या पाचही रुग्णांना मिडास मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. त्यांची पार्श्वभूमी तपासली असता कावीळसाठी कारणीभूत ठरणारे काेणतेही लक्षण त्यांना आढळून आले नाही. या पाचपैकी दोन रुग्ण असे हाेते ज्यांनी वर्षभरात दाेनदा गुळवेलचे सेवन केले व दाेन्ही वेळा त्यांना कावीळची लागण झाली हाेती. उर्वरित तिघांच्या लिव्हरची तपासणी केली असता औषधांमुळेच लिव्हरला नुकसान पाेहोचल्याचा निष्कर्ष समाेर आला. मधुमेह किंवा थाॅयराईड असलेल्या रुग्णांना अशाप्रकारे लिव्हरला नुकसान हाेण्याचा धाेकाही अधिक असताे.
गुळवेलला संस्कृतमध्ये गुडूची म्हटले जाते व त्याचे वैज्ञानिक नाव ‘टिनाेस्पाेरा कार्डिफाेलिया’ असे आहे. या वनस्पतीची पाने, शाखा व मुळांच्या तुकड्यांना पाण्यात उकडून काढा तयार करून पिण्यात येते किंवा त्यांना वाळवून भुकटी तयार करून सेवन केले जाते. उल्लेखनीय म्हणजे मुंबई, काेच्छी (केरळ) आदी भागातूनही गुळवेल सेवनाने यकृताला नुकसान पाेहोचल्याची माहिती आली आहे.