मिहानमध्ये तीन वर्षांत अडीच लाख लोकांना नोकऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 09:57 PM2019-01-05T21:57:03+5:302019-01-05T21:58:17+5:30
मिहानने आता खऱ्या अर्थाने टेक ऑफ केले आहे. असेच काम सुरू राहिल्यास येत्या दोन ते तीन वर्षांत तब्बल अडीच लाख लोकांना एकट्या मिहानमध्येच नोकऱ्या उपलब्ध होतील, अशी माहिती मिहानचे जनसंपर्क अधिकारी दीपक जोशी यांनी येथे दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मिहानने आता खऱ्या अर्थाने टेक ऑफ केले आहे. असेच काम सुरू राहिल्यास येत्या दोन ते तीन वर्षांत तब्बल अडीच लाख लोकांना एकट्या मिहानमध्येच नोकऱ्या उपलब्ध होतील, अशी माहिती मिहानचे जनसंपर्क अधिकारी दीपक जोशी यांनी येथे दिली.
फॉर्च्युन फाऊंडेशनतर्फे वसंतराव देशपांडे सभागृहात सुरू असलेल्या युथ एम्पॉवरमंट समीटमध्ये शनिवारी मिहानमधील रोजगाराच्या संधी या विषयावर ते बोलत होते. माजी उपमहापौर संदीप जाधव अध्यक्षस्थानी होते.
दीपक जोशी यांनी सुरुवातीला मिहानच्या एकूणच विकासाच्या इतिहासावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, ३५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला मिहान प्रकल्प हा खऱ्या अर्थाने नागपूरसह विदर्भाचे आर्थिक चित्र बदलविणारा आहे. याच्या पायाभूत विकासावरच तब्बल १५०० कोटी रुपये खर्च झाले आहे. मिहान हा केवळ प्रकल्प नसून या माध्यमातून एक नवीन शहर निर्माण होत आहे. त्यामुळे रोजगारांच्या अनेक संधी आपसुकच निर्माण झालेल्या आहेत. मिहानमध्ये १०० कंपन्यांनी जमिनी घेतल्या आहेत. यापैकी ३५ कंपन्यांनी कामाला सुरुवात केली आहे. टीसीएस, टेक महिंद्रा, इन्फोसिस यासारख्या आयटी क्षेत्रातील जागतिक दर्जाच्या कंपन्या मिहानमध्ये सुरू झाल्या आहेत. एकट्या टीसीएसमध्येच चार हजार कर्मचारी काम करीत आहेत. आठ हजार कर्मचाऱ्यांची त्यांची क्षमता आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आणखी नोकऱ्याच्या संधी आहेत. एससीएलमध्ये ७०० कर्मचारी काम करतात. एफएसी गोदाम आहे. बीग बाजारचा संपूर्ण माल या गोदामातूनच जातो. एकूणच मिहानमध्ये आजच्या घडीला १५ हजार लोकांना प्रत्यक्ष रोजगार मिळाला असून, ४५ हजार लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळालेला आहे. एकूणच येत्या १० वर्षांत मिहान हे नागपूरच्या विकासासाठी वरदान ठरणारे आहे.
फाल्कन विमानांचे काम जोरात
मिहानमध्ये द सॉल्ट आणि रिलायन्स कंपनीचे संयुक्त सहभाग असलेल्या एव्हीएशन कंपनीद्वारे फाल्कन विमानाचे काम जोरात सुरू आहे. सध्या कॉकपीटपर्यंतचे काम झाले असून, २०२२ पर्यंत फाल्कन विमाने बनून पूर्ण होतील, अशी माहिती दीपक जोशी यांनी दिली.
पंतजलीचे काम एप्रिलपासून सुरू होणार
रामदेवबाबा यांच्या पतंजलीने मिहानमध्ये २३४ एकर जागा घेतली आहे. देशातील सर्वात मोठा फूड पार्क पतंजली येथे उभारत आहे. त्याचे एक शेड हेच पाच एकर परिसरात उभारण्यात आले आहे. ५ ते ७ हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प आहे. येत्या एप्रिलमध्ये त्याचे काम सुरू होणार आहे. काम सुरू झाल्यावर दरवर्षी तब्बल १०० कोटी रुपयांचा कच्चा माल ते येथील शेतकऱ्यांकडूनच खरेदी करणार असल्याचे जोशी यांनी सांगितले.
चर्मोद्योगात मोठी संधी
संत रविदास चर्मोद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राजेश ढाबरे यांनी यावेळी चर्म उद्योगाबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, चामड्यांचा उद्योग हा देशातील पाचव्या क्रमांकाचा सर्मात मोठा उद्योग आहे. परंतु याकडे कुणाचेच लक्ष नाही. आज चामड्यांच्या वस्तूंना प्रचंड मागणी आहे. जोडे, चपलांपासून तर बॅग व जॅकेटपर्यंत अनेक प्रकार आहेत. या क्षेत्रात उद्योग स्थापित करण्याबाबत विचार केल्यास मोठी संधी आहे. यावेळी तुषार कुलकर्णी यांनी प्रेझेंटेशन सादर केले.
संशोधनासह कौशल्याचे प्रशिक्षण देणारी ‘बार्टी’
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीचे महासंचालक कैलास कणसे यांनीही बार्टीच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले. बार्टीचा मुख्य उद्देशच संशोधनासह कौशल्याचे प्रशिक्षण देणे हे आहे. अनुसूचित जातीतील विविध जातींचा व समाजाचा अभ्यास करणे, व त्यासंबंधीचा अहवाल शासनास सादर करणे हे बार्टीचे काम आहे. यासोबतच कौशल्य विकास प्रशिक्षणाचे कार्यक्रम राबवले जातात. २०१३ पासून १४ हजार विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले. यापैकी साडेसहा हजार लोकांना रोजगाराची संधी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्याचे कणसे यांनी सांगितले. यासोबतच बार्टीच्या विविध योजनांची माहितीही त्यांनी यावेळी दिली.