मिहान ठरणार भ्रमण केंद्र!
By admin | Published: March 31, 2015 02:11 AM2015-03-31T02:11:41+5:302015-03-31T02:11:41+5:30
विदेशी वाणिज्यदूत आणि कंपन्यांसाठी मिहान आता भ्रमण केंद्र ठरले आहे. त्यांच्याकडून उद्योग उभारणी शून्य आहे.
नागपूर : विदेशी वाणिज्यदूत आणि कंपन्यांसाठी मिहान आता भ्रमण केंद्र ठरले आहे. त्यांच्याकडून उद्योग उभारणी शून्य आहे. निमंत्रणानंतर एक सोपस्कार म्हणून मिहानचा दौरा करणे आणि अहवाल तयार करून आपल्या सरकारला पाठविणे, हाच नित्यक्रम वाणिज्यदूतांचा झाल्याचे गेल्या पाच वर्षांत मिहानच्या पाहणी दौऱ्यावरून दिसून येते.
गेल्या पाच वर्षांत विकसित देशांच्या वाणिज्यदूतांनी आपापल्या देशातील उद्योजकांसोबत मिहानचा दौरा केला आहे. पण त्या उद्योजकांनी मिहानमध्ये एकाही उद्योगांची उभारणी केलेली नाही. अमेरिका, ब्रिटन, जपान, स्विर्त्झंलंड, झेकोस्लोव्हाकिया, दुबईचे शेख, पूर्वी सिंगापूर आणि आता चीनच्या वाणिज्यदूतांनी उद्योजकांसोबत मिहानचा दौरा केला. या दौऱ्यांची फलश्रुती काहीच नाही. मग मिहानची पाहणी हा एक सोपस्कार की गुंतवणूक, हा मुद्दा आता पुढे आला आहे. दौऱ्यानंतर वाणिज्यदूत आणि उद्योजकांची नोंद मिहानच्या गुंतवणूकदारांच्या प्रतीक्षा यादीत केली जाते. हीच मिहानच्या पाहणी दौऱ्याची फलश्रुती असल्याचे सूत्रांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)
केवळ पाहणी अहवाल
विदेशी उद्योजक मिहानला भेट देतात, तेव्हा ते विविध एजन्सीच्या माध्यमातून मिहानमध्ये उपलब्ध सुविधा, सुरक्षा व्यवस्था, कुशल कामगार, विजेचा प्रश्न, जागतिक स्तरावर मिहान प्रकल्पाची पत व क्रमवारी तसेच विविध करप्रणालीची माहिती घेतात. उत्पादन प्रकल्प विशेष आर्थिक क्षेत्रात (एसईझेड) उभारायचा झाल्यास उद्योजकांना निर्यातीचा विचार करावा लागतो. आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून राहून व्यवसाय करणे सोपे नाही. अशास्थितीत स्थानिक, राज्य आणि देशांतर्गत बाजारापेठा त्यांच्यापासून दुरावतात. याच कारणांनी देशातील एसईझेडमध्ये ९० टक्के जागा रिक्त आहेत. तसेच ज्या १० टक्के जागांवर उद्योग उभे आहेत, त्यातील अर्ध्यांपेक्षा जास्त उद्योग मंदीत आहेत. त्यामुळे मिहान-एसईझेडमध्ये उत्पादित वस्तूंना स्थानिक बाजारपेठांमध्ये विकण्याची परवानगी जोपर्यंत मिळणार नाही, तोपर्यंत विकसित देशांचे वाणिज्यदूत आणि उद्योजकांनी मिहानचे कितीही दौरे केले तरी एकही उद्योग इथे उभा राहणार नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
मिहान-एसईझेडमध्ये
३३ आयटी कंपन्या
मिहान-एसईझेडमध्ये सुरू असलेल्या ५७ आयटी कंपन्यांमध्ये ३३ छोट्यामोठ्या आयटी कंपन्या आहेत. या कंपन्या पायाभूत सुविधा उपलब्ध असलेल्या छोट जागांमध्येही सुरू करता येतात. विदेशातील आॅर्डरवर अवलंबून असल्याने या कंपन्या तग धरून आहेत. त्याच कारणांमुळे मिहानचे व्यवस्थापन आयटी क्षेत्रातील छोट्या कंपन्यांना प्रोत्साहन देत आहे. सध्या आयटी व फार्मा कंपन्या मिहानमध्ये उद्योग सुरू करण्यासाठी पुढे येत आहेत. पण त्यांची पहिली पसंती मुंबई, पुणे, अहमदाबाद, हैदराबाद, बेंगळुरू, नव्याने स्थापन झालेल्या तेलंगणानंतर मिहानला आहे.
नवीन एसईझेड पॉलिसीची मागणी
४सध्याची एसईझेड पॉलिसी नवीन उद्योगांना एसईझेडमध्ये आकर्षित करण्यात अपयशी ठरली आहे. करमुक्त प्रणालीची गरज आहे. या क्षेत्रातील उद्योगावर एमएटी, एएमटी आदींसह विविध कराची आकारणी केली जाते. शिवाय स्थानिक बाजारपेठेत माल विकण्यावर ७० टक्क्यांपर्यंत आयात शुल्क आकारण्यात येते. अशा करप्रणालीमुळे उद्योजक एसईझेडमध्ये उद्योग सुरू करण्याचा विचारही करीत नाही. लवकरच घोषित होणाऱ्या एसईझेड पॉलिसीमध्ये करमुक्त धोरणांचा समावेश असावा, अशी उद्योजकांची मागणी आहे.