सरकारच्या दुर्लक्षामुळे मिहान मागे पडला : आशिष देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 01:01 AM2019-10-11T01:01:16+5:302019-10-11T01:03:54+5:30
नागपूर व विदर्भाला आंतरराष्ट्रीय नकाशावर आणणारा महत्त्वाकांक्षी मिहान प्रकल्प शासनाच्या दुर्लक्षामुळे मागे पडला आहे, तरीही सरकार खोट्या आश्वासनांचा पाऊस पाडत आहे, अशा शब्दात कॉर्पस आघाडीचे दक्षिण-पश्चिम नागपूरचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांनी टीका केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरमध्ये सुशिक्षित बेरोजगारांसाठी हव्या तशा नोकऱ्या नाहीत. स्वयंरोजगाराच्या योजना कौशल्याविना बिनकामाच्या ठरल्या आहेत. नागपूर व विदर्भाला आंतरराष्ट्रीय नकाशावर आणणारा महत्त्वाकांक्षी मिहान प्रकल्प शासनाच्या दुर्लक्षामुळे मागे पडला आहे, तरीही सरकार खोट्या आश्वासनांचा पाऊस पाडत आहे, अशा शब्दात कॉर्पस आघाडीचे दक्षिण-पश्चिम नागपूरचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांनी टीका केली.
गुरुवारी सकाळी ८ वाजता माटे चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण व अभिवादन करून आशिष देशमुख यांनी बाईक रॅलीच्या माध्यमातून प्रचाराचाशुभारंभ केला. यावेळी ते बोलत होते.
सुभाष नगर, त्रिमूर्ती नगर, खामला, सोनेगाव, जयप्रकाश नगर, मनीष नगर, नरेंद्र नगर, छत्रपती नगर व लगतचा परिसर या रॅलीने पालथा घातला व जनसंपर्क साधला. रॅलीमध्ये शहर काँग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील, राकेश पन्नासे, डॉ. आयुश्री देशमुख यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी देशमुख पुढे म्हणाले, नवीन गुंतवणूक नाही त्यामुळे बेरोजगार युवक तसेच व्यवसाय, उद्योग, आय टी कंपन्या, सॉफ्टवेअर कंपन्यांना विकासाची संधी मिळाली नाही. गरजू महिलांना प्रोत्साहन मिळेल अशा रोजगारासंबंधी योजनांचा अभाव आहे. उद्योगांची या सरकारने वाट लावली आहे. सरकारी तिजोरी रिकामी आहे.
नागपूर शहर स्मार्ट सिटीच्या फार दूर आहे. पेट्रोल, डिझेलच्या दराने उच्चांक गाठला. त्यामुळे महागाई वाढली आहे. जीएसटी, नोटाबंदी व आर्थिक मंदी ही सरकारने लादलेली समस्या आहे. व्यापारी भरडला जात आहे. लोकांना हातचा रोजगार गमवावा लागत आहे.काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे म्हणाले, मागील पाच वर्षात भाजपा सरकारने जनतेसाठी काहीच केले नाही. बेरोजगारी, उद्योगधंदे, महागाई यामुळे जनता त्रासली आहे.