मिहानची झेप, मेट्रोेला गती
By admin | Published: March 19, 2016 02:22 AM2016-03-19T02:22:24+5:302016-03-19T02:22:24+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘होम टाऊन’ असलेल्या नागपुरात उभारले जात असलेले महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी
कमलेश वानखेडे ल्ल नागपूर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘होम टाऊन’ असलेल्या नागपुरात उभारले जात असलेले महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आर्थिक पाठबळ दिले आहे. मिहान, मेट्रोरेल्वे, गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय यासारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या या सकारात्मक भूमिकेमुळे नागपूरचे चित्र पालटेल, असा दावा सत्ताधारी आमदारांनी केला असून सरकारने जुन्याच योजनांसाठी तुटपुंजा निधी देऊन बोळवण केली, अशी टीका विरोधकांनी केली आहे.
मिहान प्रकल्पात विदर्भाचे आर्थिक चित्र पालटण्याची क्षमता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकल्पातील अडथळे दूर करण्यावर भर दिला आहे. प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनामुळे या प्रकल्पाच्या कामात अडथळा येऊ नये याची काळजी राज्य सरकारने अर्थसंकल्पात घेतली आहे. मिहान प्रकल्पातील भूसंपादन, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, उर्वरित भूसंपादन, सानुग्रह अनुदान वाटप तसेच विशेष बाब सानुग्रह अनुदान आदीसाठी १ हजार ५०८ कोटी ३६ लाख रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या अनुषंगाने अर्थसंकल्पात २१६ कोटी ३३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
नागपूर मेट्रोरेल्वे बऱ्यापैकी रुळावर आली आहे. माती परीक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. अर्थसंकल्पात नागपूर व पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पांच्या कामांना गती देण्यासाठी १८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नागपूर मेट्रोरेल्वेचे काम पुणे मेट्रोच्या तुलनेत बरेच प्रगतिपथावर आहे. त्यामुळे या तरतुदीतील बहुतांश निधी नागपूर मेट्रोच्या वाट्याला येईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. गोरेवाडा येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणिसंग्रहालय उभारले जात आहे. नियोजित आराखड्यानुसार या प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पाला चालना देण्यासाठी ४० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
सुमतीताईंच्या त्यागाचा गौरव
४महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि राजकारणात महिलांचा टक्का वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या नागपुरातील ज्येष्ठ समाजसेविका सुमतीताई सुकळीकर यांच्या नावाने ‘सुमतीताई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण’ ही योजना सुरूकरण्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी अर्थसंकल्पात केली आहे. सुमतीताई सुकळीकर या जनसंघाच्या जुन्या व ज्येष्ठ नेत्या होत्या. प्रसिद्ध बालजगतच्या त्या संस्थापिका होत. विदर्भातील सामाजिक कार्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या नावाने महिला सक्षमीकरण योजना सुरू करून राज्य शासनाने त्यांचा यथोचित सन्मान केला आहे. उपराजधानीसाठीही गौैरवास्पद बाब आहे.
लॉजिस्टीक हब उभारणार
नागपूर परिसरात लॉजिस्टीक व्यवसायाला चालना देण्यासाठी लॉजिस्टीक हबची स्थापना केली जाणार आहे. येथे विविध राज्यांतून येणाऱ्या मालाचे पॅकिंग व रिपॅकिंग होईल व विक्री केली जाईल. येथून विक्री होणाऱ्या मालावर केंद्रीय विक्रीकर माफ केला जाईल. या अंतर्गत राज्य सरकारतर्फे केंद्रीय विक्रीकर कायद्यांतर्गत अधिसूचना जारी करण्यात येईल, असेही अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी जाहीर केले.