मिहानचा लूक बदलतोय...
By admin | Published: December 29, 2016 03:02 AM2016-12-29T03:02:20+5:302016-12-29T03:02:20+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे
मध्ये दीड हजार जणांना रोजगार, दोन हजार कोटींची गुंतवणूक
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे मिहानमध्ये वर्ष २०१६ मध्ये पतंजली, रिलायन्स एरोस्ट्रक्चर लि., इंडो-युके हेल्थ इन्स्टिट्यूटसह एम्स, आयआयएम आदींसह अनेक उद्योगांची मुहूर्तमेढ झाली आहे. त्यामुळे मिहानला आता खऱ्या अर्थाने गती प्राप्त झाली आहे. अनेक कंपन्यांचे काम वेगात सुरू आहे. टीसीएस, इन्फोटेक, लुपिन, एअर इंडिया, टाल, एमआरओ या सारख्या कंपन्या कार्यरत आहेत. उद्योगांना लागणाऱ्या साऱ्याच पंचतारांकित सोयीसुविधा आणि वीज, पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने वर्ष २०१६ मध्ये देशभरातील कंपन्यांचा ओघ मिहानकडे वळला आहे. मिहानमध्ये एमएडीसीने अद्ययावत इन्फ्रास्ट्रक्चर तयार केले आहे. उद्योगांना लागणाऱ्या सोई उपलब्ध असल्यामुळे येत्या काळात अनेक कंपन्यांमध्ये हजारोंना रोजगार उपलब्ध होण्यासह विदर्भाचा विकास होणार आहे.
प्रकल्पाचा विकास व सद्यस्थिती
महाराष्ट्र सरकारने ४ जानेवारी २००२ साली मिहान प्रकल्पाला मान्यता दिली आणि त्यासाठी एमएडीसी ही नोडल एजन्सी स्थापन केली. भारत सरकारने जानेवारी २००८ ला महाराष्ट्र सरकारचा मल्टी मॉडेल इंटरनॅशनल पॅसेंजर कार्गो हब एअरपोर्ट प्रकल्प मंजूर केला.
या प्रकल्पाची मूळ कल्पना कार्गो हब अशी आहे. या प्रकल्पाचे दोन भाग असून पहिला कार्गो हब व दुसरा आर्थिक विशेष क्षेत्र. त्यासाठी किमान दोन धावपट्ट्या आवश्यक आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ खासगीकरणाच्या माध्यमातून अत्याधुनिक करण्यासाठी जागतिक निविदा काढण्यात आल्या आहेत. विमानतळाशेजारी उत्पादन होणारे विशेष आर्थिक क्षेत्र आहे. मिहान प्रकल्पाचे ठिकाण भोगौलिकदृष्ट्या देशाच्या मध्यभागी आहे. येथून रस्ता, हवाईमार्ग, रेल्वे मार्ग सहज उपलब्ध आहेत.
मिहान प्रकल्पाचे प्रमुख दोन भाग आहेत. विशेष आर्थिक क्षेत्र आणि नॉन-सेझ. अस्तित्वात असलेल्या आंतरराष्ट्रीय मिहान प्रकल्प ४२०० हेक्टरमध्ये आहे. यातील १,३६० हेक्टर जागा विमानतळासाठी व दोन हजार हेक्टर जागा सेझसाठी आहे.
सेझमधील बीपीएस, टाल आणि लुपिन फार्मा यांनी निर्यात सुरू केली आहे. तसेच एअर इंडियाचा एमआरओ सुसज्ज आहे. टीसीएस सुरू झाले आहे. लुपिन फार्मा यांनी २५० कोटी गुंतवणूक केली आहे.