मिका सिंगची म्युझिकल नाईट झालीच नाही : आयोजकांनी हडपले १२ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 08:48 PM2019-08-03T20:48:31+5:302019-08-03T20:48:55+5:30
पार्श्वगायक मिका सिंग नाईटच्या आयोजनातून लाखोंचा फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका डेकोरेटर्सला ६ जणांनी १२ लाखांचा गंडा घातला. जरीपटका पोलीस ठाण्यात या प्रकरणी शुक्रवारी गुन्हा दाखल झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पार्श्वगायक मिका सिंग नाईटच्या आयोजनातून लाखोंचा फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका डेकोरेटर्सला ६ जणांनी १२ लाखांचा गंडा घातला. जरीपटका पोलीस ठाण्यात या प्रकरणी शुक्रवारी गुन्हा दाखल झाला. आरोपींमध्ये गायक मिका सिंगची दिल्लीतील कथित व्यवस्थापक सपना मेहता, मुंबईतील इव्हेन्ट मॅनेजर रजनीश बेरी, अभिजीत चौधरी आणि रिदम बॅनर्जी तसेच नागपुरातील इव्हेन्ट आॅर्गनायझर सुमित तिडके आणि अमित तिडके यांचा समावेश आहे.
फिर्यादी विजय परशूराम वालदे (वय ४९) हे इंदोरा (बेझनबाग) मधील मॉडेल टाऊन येथे राहतात. त्यांचा डेकोरेशन आणि कॅटरर्सचा व्यवसाय आहे. उपरोक्त आरोपींनी २१ डिसेंबर २०१३ ला वालदे यांना नागपुरात मिका सिंगची म्युझिकल नाईट आयोजित केल्यास लाखोंचा लाभ मिळेल, असे सांगून कार्यक्रमाच्या आयोजनात सहभागी होण्यासाठी तयार केले. त्यानंतर सपना, सुमीत आणि अमित या तिघांनी वालदेंकडून कार्यक्रम आयोजनाच्या सहभागासंबंधीचा करारनामा लिहून घेतला. त्याचवेळी वालदेंकडून त्यांनी टप्प्याटप्प्याने १२ लाख रुपये घेतले. डिसेंबर २०१३ मध्ये वालदेंसोबत करारनामा केल्यानंतर आरोपींनी हा कार्यक्रम २०१४ ला करू असे सांगितले होते. नंतर कार्यक्रमाची तारीख वेगवेगळे कारण सांगून पुढे ढकलली. आता त्याला ५ वर्षे झाली. मात्र, आरोपींनी मिकासिंग म्युझिकल नाईट (कार्यक्रम) नागपुरात घेतलीच नाही. आरोपींकडून कार्यक्रम घेतला जाणार नाही, हे लक्षात आल्यामुळे वालदे यांनी त्यांना आपली रक्कम परत मागितली. आरोपींनी रक्कम परत देण्यासाठी वेगवेगळ्या तारखा दिल्या परंतू रक्कम परत केली नाही. ते टाळाटाळ करीत असल्याचे आणि आरोपींनी आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने वालदे यांनी जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी शुक्रवारी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.