मनसर परिसरात मॉईलचा एक हजार कोटींचा प्रकल्प
By admin | Published: October 24, 2015 03:21 AM2015-10-24T03:21:59+5:302015-10-24T03:21:59+5:30
मनसर- खापा परिसरात मोठ्या प्रमाणात मॅगनीजच्या खाणी आहेत. मात्र, मॅगनीजवर प्रक्रिया करणारे प्रकल्प या भागात नाहीत.
कृपाल तुमाने : आठ हजार युवकांना रोजगार
नागपूर : मनसर- खापा परिसरात मोठ्या प्रमाणात मॅगनीजच्या खाणी आहेत. मात्र, मॅगनीजवर प्रक्रिया करणारे प्रकल्प या भागात नाहीत. मॉईलने मॅगनीजवर प्रक्रिया करून फेरोअलाय तयार करण्याचा प्रकल्प भिलाई येथे उभारण्याची तयारी चालविली होती. येथील वीज दर जास्त आहेत, अशी त्यांची तक्रार होती. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आपण स्वत: व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठक घेतली. त्यानंतर राज्य सरकारने कमी दरात वीज उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविल्यामुळे आता मॉईल याच परिसरात एक हजार कोटींचा प्रकल्प उभारणार आहे. यामुळे सुमारे ८ हजार युवकांना रोजगार मिळेल, अशी माहिती रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी दिली.नागपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.
तुमाने म्हणाले, नागपूर जिल्ह्यात पाहिजे त्या प्रमाणात औद्योगिकीकरण झालेले नाही. मौदा,हिंगणा एमआयडीसीमध्ये काही प्रमाणात उद्योग सुरू आहेत. बुटीबोरी या पंचतारांकित एमआयडीसीमधील बहुतांश उद्योग बंद आहेत. हे चित्र बदलायचे आहे. मौदा- रामटेक रोडवर अल्ट्राटेक सिमेंट कंपनी उद्योग उभारत आहे. मात्र, उद्योग उभारणीसाठी आपण सहकार्य करतो, परवानगी देतो व बिहार, उत्तर प्रदेशातील कामगारांना येथे कामावर घेतले जात असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ही सिमेंट कंपनी सुरू करताना नागपूर जिल्ह्यातील रहिवाशांची भरती करावी, अशी मागणी करण्यात आली असून कंपनीने ते मान्य केले आहे. रामटेक गड मंदिराच्या विकासासाठी माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांनी १०० कोटींचा प्रस्ताव मंजूर झाल्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात एक रुपयाही मंजूर झाला नाही. विभागीय आयुक्तांच्या कमिटीपुढे प्रस्ताव सादर केल्यानंतर विकासासाठी ६ कोटी रुपये मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
अमरावतीवरून मुंबई- पुण्यासाठी रेल्वे गाड्या सुटतात. या गाड्या नरखेडवरून सोडण्यात याव्यात, नागपूरहून दिल्लीला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना नरखेड येथे थांबा द्यावा, सव्वा लाख लोकसंख्या असलेल्या बुटीबोरी येथे रेल्वे तिकीट रिझर्व्हेशन काऊंटर द्यावे. नागपूर- रामटेक पॅसेंजर गाडी बुटीबोरीपर्यंत वाढवावी आदी मागण्या सेंट्रल रेल्वेच्या बैठकीत करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)