चीनला प्रत्युत्तर देण्यास सैन्य सक्षम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 01:41 AM2017-08-02T01:41:56+5:302017-08-02T01:42:33+5:30
चीनच्या सैन्याने उत्तराखंडातील बाराहोटी भागात पुन्हा घुसखोरी केल्याचे उघडकीस आल्यामुळे सीमेवर तणाव आणखी वाढला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चीनच्या सैन्याने उत्तराखंडातील बाराहोटी भागात पुन्हा घुसखोरी केल्याचे उघडकीस आल्यामुळे सीमेवर तणाव आणखी वाढला आहे. या घुसखोरीबाबत नेमकी अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही. मात्र या भागाचे चिन्हांकन झालेले नसल्यामुळे असे प्रकार घडत असतात. मात्र चीनने जाणूनबुजून घुसखोरी केली असल्यास त्यांना प्रत्युत्तर देण्यास भारतीय सैन्य सक्षम आहे, असे स्पष्ट मत उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी व्यक्त केले. मंगळवारी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली व सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची भेट घेतली. याअगोदर त्यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधला.
चमोली जिल्ह्यातील बाराहोटी हे गाव असून हा भाग अनेक काळापासून वादग्रस्त आहे. या भागाचे अद्याप चिन्हांकन झालेले नाही. भारत व चीन दोन्ही देशांचे सैनिक तेथे शस्त्र घेऊन जात नाहीत. मात्र या भागात दोन्ही देशातील सैनिक जात असतात. या भागात कुणीही राहत नाही. केवळ सैन्य, ‘आयटीबीपी’चे जवान व पोलीस असतात. चीनकडून चिथावणी देणारी भाषा बोलण्यात येत असेल तर आमचे सैन्यदेखील मजबूत आहे. सेनाध्यक्षांनी तर अगोदरच आपली भूमिका स्पष्ट करून कुठल्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार असल्याचे म्हटले होते, याची आठवणदेखील त्यांनी करून दिली.
संघ स्वयंसेवक म्हणून भेट
सरसंघचालकांसोबत भेटीबाबत विचारणा केली असता, मी एक संघ स्वयंसेवक असून नागपूर माझी प्रेरणाभूमी आहे. नागपुरात राष्ट्रीय कर्करोग केंद्राला भेट देण्यासाठी आलो होतो. त्यामुळे सरसंघचालकांना स्वयंसेवक म्हणून भेटणार आहे. उत्तराखंडमध्येदेखील टाटा समूहाच्या मदतीने कर्करोग केंद्र निर्माण करत असल्याची माहिती त्यांनी दिली.
उत्तराखंडमध्ये एकाही शेतकºयाचे पत्र नाही
उत्तराखंडमध्ये शेतकरी आत्महत्येवर वाद सुरू आहे. यासंदर्भात विचारणा केली असता राज्यातील ९० टक्के लोक शेतकरी आहेत. मात्र आतापर्यंत एकाही शेतकºयाच्या आत्महत्येचे पत्र प्राप्त झालेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात चौकशी सुरू असून अहवाल प्राप्त झाल्यावरच पुढील भाष्य करता येईल, असे त्यांनी सांगितले.
नागपुरातील उद्योजकांशी चर्चा
रावत यांचे नागपुरात दुपारी १२ च्या सुमारास आगमन झाले. त्यानंतर त्यांनी एका खासगी हॉटेलमध्ये विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पदाधिकाºयांची भेट घेतली. डिसेंबरमध्ये डेहराडून येथे उद्योजक मेळावा आयोजित केला आहे. त्याचे निमंत्रण नागपुरातील उद्योजकांना दिले, असे रावत यांनी सांगितले. यावेळी त्यांनी प्रशासनातील काही अधिकाºयांचीदेखील भेट घेतली.