मिलिटरी इंटेलिजन्सने केला ठगबाजांच्या टाेळीचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:09 AM2021-09-19T04:09:16+5:302021-09-19T04:09:16+5:30
नागपूर : सेनेमध्ये भरतीच्या नावावर युवकांची फसवणूक करणाऱ्या टाेळीचा मिलिटरी इंटेलिजन्सने पर्दाफाश केला आहे. इंटेलिजन्सकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे उत्तर ...
नागपूर : सेनेमध्ये भरतीच्या नावावर युवकांची फसवणूक करणाऱ्या टाेळीचा मिलिटरी इंटेलिजन्सने पर्दाफाश केला आहे. इंटेलिजन्सकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील पाेलिसांच्या पथकाने टाेळीच्या सूत्रधारासह इतर दाेन आराेपींना अटक केली आहे. ही टाेळी काही दिवसापूर्वी नागपूर जिल्ह्यातील कामठीमध्ये झालेल्या सैन्य भरतीदरम्यान सक्रिय हाेती.
लाेकमतला मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये शुभम शर्मा, राहुल शर्मा व महेंद्र पाल यांचा समावेश असून, ते उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील बसई गावचे रहिवासी आहेत. कामठीमध्ये ५ सप्टेंबर २०२१ ला सेनेच्या विविध पदांसाठी भरती प्रक्रियेचे आयाेजन करण्यात आले हाेते. देशभरातून तरुण या भरतीसाठी पाेहचले हाेते. सूत्रानुसार टाेळीचा सूत्रधार शुभम शर्मा त्याच्या भावाला घेऊन कामठीला पाेहचला हाेता. त्याची भेट उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यातील लवलेश कुमार यादव नामक तरुणाशी झाली. शुभमने त्याच्याशी मैत्री करून त्याचा माेबाईल क्रमांक मिळविला. शुभमने नंतर लवलेशचा माेबाईल नंबर त्याचा चुलत भाऊ आराेपी राहुल शर्माला दिला. पुढे शुभमने लवलेशशी संपर्क करून स्वत:ची सैन्य दलात उच्च पदावरच्या अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे सांगितले. त्याला नाेकरीवर लावण्याचे आमिष दाखवून २० हजार रुपयाची मागणी केली. भरती झाल्यानंतर उर्वरित ८० हजार देण्यास सांगितले. यासाठी लवलेश तयार झाला. त्यानंतर शुभमने त्याला एक माेबाईल क्रमांक देऊन संपर्क करण्यास सांगितले. लवलेशने संपर्क केल्यानंतर आराेपी राहुलने काॅल घेत स्वत:ला सेनेचा अधिकारी असल्याचे सांगत, सेनेत भरती करण्याचा विश्वास दिला. साेबतच बँक खात्याचा क्रमांक देऊन त्यात २० हजार रुपये जमा करण्यास सांगितले. हे खाते आराेपी महेंद्र पालचे हाेते.
- असे आले उजेडात प्रकरण
सेनेची भरती प्रक्रिया कठाेर नियमाच्या आधारे हाेत असते. तरुणांना ठगबाजांपासून वाचविण्यासाठी मिलिटरी इंटेलिजन्सही सक्रिय हाेते. यादरम्यान ठगबाजांची टाेळी सक्रिय असल्याचा संशय इंटेलिजन्सला आला. त्यांनी संशयितांवर नजर ठेवली. उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्याची एक टाेळी सेनेत भरतीच्या नावावर तरुणांची फसवणूक करीत असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली. प्रकरणाचा तपास करीत १६ सप्टेंबरला इंटेलिजन्सने बरेलीच्या गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. बरेली गुप्तचर विभागाने स्थानिक पाेलिसांना माहिती देत एफआयआर दाखल केली. १७ सप्टेंबरला तिन्ही आराेपींना अटक करण्यात आली. सध्या तिन्ही आराेपी उत्तर प्रदेश पाेलिसांच्या ताब्यात आहेत.
- हाेणार कसून चाैकशी
सूत्राच्या माहितीनुसार सैन्य भरतीत फसवणूक करणाऱ्या आराेपींची कसून चाैकशी केली जाईल. आराेपींनी आणखी किती तरुणांना सेनेत भरती करण्याचे आमिष दिले, त्यांनी यापूर्वी कुठे सेना भरतीत फसवणूक केली आणि या टाेळीत आणखी किती लाेकांचा समावेश आहे, याचीही कसून चाैकशी केली जाणार आहे.