सैनिकी शाळेतील मुली उपाशी
By Admin | Published: September 24, 2015 03:21 AM2015-09-24T03:21:06+5:302015-09-24T03:21:06+5:30
राष्ट्रभक्तीच्या भावनेतून देशसेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुलींसाठी सरकारने सैनिकी शाळा सुरू केल्या.
रेशन नाही म्हणून भोजन बंद : ९० टक्के मुली परतल्या घरी, अनुदान जाते तरी कुठे?
मंगेश व्यवहारे नागपूर
राष्ट्रभक्तीच्या भावनेतून देशसेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुलींसाठी सरकारने सैनिकी शाळा सुरू केल्या. विदर्भातही दहा वर्षापूर्वी १०० टक्के अनुदान तत्त्वावरील सैनिकी मुलींची निवासी शाळा नागपूरजवळच्या वडधामन्यात सुरू करण्यात आली. मात्र, या शाळेत शिकणाऱ्या मुलींना दोनवेळचे जेवणही मिळत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. उपाशीपोटी राहावे लागत असल्याने ९० टक्के मुली घरी परतल्या आहेत. या सैनिकी शाळेला सरकारी अनुदान मिळते. तरीही संस्थाचालक शाळेत रेशनचा पुरवठा करीत नाही. त्यामुळे अनुदान जाते तरी कुठे, हा संशोधनाचा विषय ठरला आहे.
समाजकल्याण विभागाची लक्तरे वेशीला टांगणाऱ्या या संस्थेला अधिकाऱ्यांचेच तर पाठबळ नसावे ना, असा प्रश्न वारंवार तक्रारी करूनही दखल न घेतली जात असल्याने उपस्थित केला जात आहे.
महावैष्णवी महिला मंडळाद्वारे संचालित असलेली राणी लक्ष्मीबाई नावाने मुलींची सैनिकी शाळा २००५पासून वडधामना येथे चालविली जात आहे. शाळेच्या शेजारीच मुलींचे वसतिगृह आहे. पाचवी ते दहावीपर्यंत येथे वर्ग आहेत. विदर्भातील ९० मुली येथे प्रशिक्षण घेत आहेत. प्रत्येक मुलीमागे १५००० रुपयांचे अनुदान समाजकल्याण विभागाकडून संस्थेला देण्यात येते. या अनुदानातून संस्था मुलींच्या राहण्याची, खाण्याची सोय करते. गेल्या काही महिन्यापासून संस्थाचालकाच्या दुर्लक्षामुळे येथील मुलींचे हाल होत आहेत. नियमानुसार मुलींना दररोज दुध, नाश्ता, पौष्टिक आहार मिळणे गरजेचे आहे. परंतु येथे नियमित जेवणाचेही वांदे झाले आहेत.
गेल्या महिन्याभरापासून वसतिगृहातील रेशन संपले आहे. संस्थाचालकांना वारंवार सांगूनही त्यांनी याकडे लक्ष दिले नाही.
शौेचालयात किचन,
स्वयंपाक मुलींकडे
शौचालयाच्या ठिकाणी किचन बनविण्यात आले आहे. किचनमध्ये ठेवलेल्या भांड्यामध्ये अन्नाचा दाणासुद्धा आढळला नाही. पिण्यासाठी फिल्टर आहे, मात्र तेही नादुरुस्त. एवढ्या मोठ्या संख्येने मुली असतानाही स्वयंपाकासाठी गॅस नसल्याने चुलीवर स्वयंपाक करावा लागतो. दोन्ही स्वयंपाकीला पगार न मिळाल्याने त्या सोडून गेल्यामुळे मुली स्वत: स्वयंपाक करीत आहेत. आंघोळीसाठी गरम पाणी उपलब्ध नाही. विशेष म्हणजे वसतिगृहाचे वीज बिल न भरल्याने वर्षभरापासून वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. वसतिगृहात अस्वच्छतेचा कळस आहे.