मनपा शाळांतील विद्यार्थ्यांना सैनिक प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 11:13 PM2019-04-24T23:13:50+5:302019-04-24T23:14:49+5:30
महापालिका शाळांत प्रामुख्याने गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी आहेत. आर्थिक स्थिती शिक्षण घेण्याजोगी नाही असे विद्यार्थी तसेच महापालिकेच्या माजी विद्यार्थ्यांना सैन्यात भरती होण्याची संधी उपलब्ध व्हावी, या हेतूने महापालिके च्या शिक्षण विभागाने समग्र शिक्षा अभियानांतर्गत सैनिक प्रशिक्षण व व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका शाळांत प्रामुख्याने गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी आहेत. आर्थिक स्थिती शिक्षण घेण्याजोगी नाही असे विद्यार्थी तसेच महापालिकेच्या माजी विद्यार्थ्यांना सैन्यात भरती होण्याची संधी उपलब्ध व्हावी, या हेतूने महापालिके च्या शिक्षण विभागाने समग्र शिक्षा अभियानांतर्गत सैनिक प्रशिक्षण व व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
जुना सुभेदार ले-आऊ ट येथील महापालिकेच्या दुर्गानगर माध्यमिक शाळेच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर २० एप्रिलपासून या प्रशिक्षणाला सुरुवात झाली असून, २० मेपर्यंत हे प्रशिक्षण चालणार आहे. कर्नल विशाल शर्मा विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहेत. माजी सैनिक संघटना व मनपाची एनडीएस चमू यासाठी सहकार्य करीत आहे. पहिल्या टप्प्यात महापालिक ा शाळांतील १०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचा महापालिकेचा मानस असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.
महापालिकेतील विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती विचारात घेता, विद्यार्थ्यांना ये-जा करण्यसाठी सायकली उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी लागणारा गणवेश, बूट व कॅप मोफत उपलब्ध करण्यात आली आहे. महापालिका प्रथमच अशा स्वरूपाचा उपक्रम राबवीत आहे. याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
प्रशिक्षणासाठी १६ वर्षांवरील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. तसेच प्रशिक्षणात प्रवेश देण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी करून उंची, वजन व शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात आली आहे. प्रशिक्षणानंतर विद्यार्थ्यांना सैनिक भरतीसंदर्भात माहिती उपलब्ध केली जाईल. प्रशिक्षणामुळे भविष्यात अनेक विद्यार्थ्यांना सैन्यात भरती होण्यासाठी मोठी मदत होणार असल्याचा विश्वास राम जोशी यांनी व्यक्त केला.