आक्रंदणाऱ्या बाळासाठी एक्सप्रेसमध्ये पोहचले दूध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2021 08:35 PM2021-12-18T20:35:48+5:302021-12-18T20:36:17+5:30

Nagpur News लांबच्या प्रवासात आईजवळचे दूध संपल्यावर टाहो फोडणाऱ्या बाळाला अखेरीस नागपूर रेल्वेस्थानकावर दूध मिळाले आणि सर्व सहप्रवाशांनी समाधान व आनंदाचा निश्वास टाकला.

Milk arrives in express for crying baby | आक्रंदणाऱ्या बाळासाठी एक्सप्रेसमध्ये पोहचले दूध

आक्रंदणाऱ्या बाळासाठी एक्सप्रेसमध्ये पोहचले दूध

googlenewsNext
ठळक मुद्देप्रवाशाचा कळवळा पाहून कर्मचारी धावले मदतीला

नागपूर : लांबच्या रेल्वे प्रवासात दीड वर्षाच्या बाळाला भूक लागली. सोबतचे दूध संपले, बाळ रडू लागले. भूक असहाय्य झाल्याने त्याचे आक्रंदन वाढले. त्याचे केविलवाणे रडे एकून अख्खी बोगीच हेलावली. ही अडचण बाळाच्या पित्याने एका ओळखीच्या रेल्वे कर्मचाऱ्याला सांगितली. तो सुद्धा कळवळला. त्याने फोनाफोनी करून पुढची व्यवस्था केली. अखेर नागपूरच्या स्थानकावर रेल्वे पोहचल्यावर बाळासाठी गरम दुधाची आणि गरम पाण्याची व्यवस्था झाली. रेल्वेतील कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेचा परिचय देणारी ही घटना पाटलीपुत्र एक्स्प्रेसमध्ये शनिवारी घडली.

शिव शंकर नामक प्रवासी पत्नी सावित्रीदेवी हिच्यासह आपल्या दीड वर्षाच्या बाळाला घेऊन रेल्वेगाडी क्रमांक २२३५१ दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसच्या कोच बी १, बर्थ क्रमांक ३३, ३६ वरून पाटलीपुत्र ते यशवंतपूर असा प्रवास करीत होता. मार्गात बल्लारशादरम्यान या दाम्पत्याच्या दीड वर्षाच्या बाळाला भूक लागली. परंतु मार्गातील रेल्वेस्थानकावर त्यांना दूध उपलब्ध झाले नाही. अखेर या प्रवाशाने रेल्वेत कार्यरत असलेल्या मोझरी येथील जितेंद्र कुमार पांडे या ओळखीच्या कर्मचाऱ्याला याबाबत माहिती दिली. त्यांनी नागपूरचे उपस्टेशन व्यवस्थापक सतीश ढाकणे यांना याबाबत माहिती दिली आणि अडचण समजावून सांगितली.

ही रेल्वे पोहचताच ढाकणे यांनी तातडीने चिमुकल्यासाठी दूध आणि गरम पाण्याची व्यवस्था केली. पाटलीपुत्र एक्स्प्रेस सायंकाळी ६.१५ वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर पोहोचताच संबंधित दाम्पत्यापर्यंत दूध आणि गरम पाणी पोहचविण्यात आले. दीड तासाच्या प्रतीक्षेनंतर बाळाच्या ओठी दूध लागले. भूक शमली. रडे थांबले. रेल्वे कर्मचाऱ्यांनी दाखविलेली ही कर्तव्यदक्षता चर्चेची ठरली. शिव शंकर आणि सावित्रीदेवी यांच्यासह बोगीतली प्रवाशांनीही या कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

............

Web Title: Milk arrives in express for crying baby

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न