विधानभवन परिसरात तापले दूध : विरोधकांनी केला सरकारविरुद्ध घंटानाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 08:25 PM2018-07-16T20:25:58+5:302018-07-16T21:14:18+5:30

राज्यभरात सुरू असलेले दुधासाठीचे आंदोलन विधिमंडळ परिसरात चांगलेच तापले. या आंदोलनावरून विरोधकांनी सरकारला टार्गेट करीत निषेधार्थ विधिमंडळाच्या पायऱ्यावर घंटानाद केला. दूध उत्पादक शेतकऱ्याला प्रति लिटर पाच रुपये अनुदान दिलेच पाहिजे, अशी मागणी विरोधकांनी रेटून धरली.

Milk hot in the Vidhan Bhavan premises : Opposition protest against the government | विधानभवन परिसरात तापले दूध : विरोधकांनी केला सरकारविरुद्ध घंटानाद

विधानभवन परिसरात तापले दूध : विरोधकांनी केला सरकारविरुद्ध घंटानाद

Next
ठळक मुद्देमंत्र्यांनी उडविली आंदोलनाची खिल्ली

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यभरात सुरू असलेले दुधासाठीचे आंदोलन विधिमंडळ परिसरात चांगलेच तापले. या आंदोलनावरून विरोधकांनी सरकारला टार्गेट करीत निषेधार्थ विधिमंडळाच्या पायऱ्यावर घंटानाद केला. दूध उत्पादक शेतकऱ्याला प्रति लिटर पाच रुपये अनुदान दिलेच पाहिजे, अशी मागणी विरोधकांनी रेटून धरली.
शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळत नाही. त्यामुळे राज्यभरात शेतकरी रस्त्यावर उतरून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दूध रस्त्यावर फेकत आहे. राज्यभरात सुरू असलेल्या या आंदोलनाचे पडसात सभागृहात उमटले. विरोधकांनी आपल्या मागण्या सरकारपुढे मांडून सभात्याग केला. विधानसभेतील दोन्ही मुख्य विरोधी पक्षातील सदस्यांनी सभागृहाच्या आतूनच ‘भाजप सरकार हाय हाय...’, ‘घंटा सरकार हाय हाय...’च्या घोषणा देत विधानभवनाच्या पायऱ्यांवर येऊन उभे राहत घंटानाद करीत सत्तारूढ सरकारच्या धोरणांचा निषेध केला. यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादीने तर शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेवर ताशेरे ओढले.

 स्थगनप्रस्तावाद्वारे आम्ही आज दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोेलनाला पाठिंबा देत आहोत. सरकारला शेतकऱ्यांशी काही घेणेदेणे नाही म्हणून आम्ही गाईच्या गळ्यातील घंटा हे प्रतीक म्हणून घंटानाद आंदोलन करीत आहोत.
राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते

 दूध विकणाऱ्याला पाच रुपये कमिशन मिळते आणि दूध उत्पादन करतो त्याचा उत्पादन खर्च निघत नाही. शेतकऱ्यांचे हितैशी म्हणणाऱ्या शिवसेनेला हे का दिसत नाही. सत्तेत सहभागी होऊन शिवसेना दुटप्पी भूमिका भूमिका वठवित आहे. तर भाजपाने सत्तेचा गैरवापर सुरू केला आहे.
अजित पवार, नेते, राष्ट्रवादी

 दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधावर दरवाढ न देण्यामागे राज्यातील सरकारचे षड्यंत्र असून गुजरातच्या अमूल कंपनीचे दूध महाराष्ट्रात आणावयाचे आहे.
जयंत पाटील, नेते, राष्ट्रवादी

 शेतकऱ्यांना २२ रुपये लिटरने दुधाला भाव मिळतो आणि प्रत्यक्ष ग्राहकांना ५० रुपये लिटरने दूध मिळत आहे. मग मधले पैसे कुठे जातात. गेल्या चार वर्षांपासून देवेंद्र फडणवीस सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. या सरकारमधील मंत्री आणि आमदार हे शहरी भागातील आहेत. त्यामुळे ग्रामीण भागाचे दुखणे त्यांना कळत नाही.
सुभाष पाटील, आमदार, शेकाप

खासदार राजू शेट्टी यांनी पुकारलेले आंदोलन लोकसभा व विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून केले आहे. ३० वर्षापासून मी त्यांच्या आंदोलनातूनच वाटचाल करीत आहो, टँकरमधून दूध कसे फेकायचे, त्यात किती पाणी व किती दूध असते, हे मला ठावुक आहे. त्यामुळे या आंदोलनाला फारसे महत्त्व नाही. या आंदोलनात शेतकरी कमी आणि पक्षाचे कार्यकर्तेच जास्त आहेत. 
सदाभाऊ खोत, कृषी राज्यमंत्री

Web Title: Milk hot in the Vidhan Bhavan premises : Opposition protest against the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.