दुधाच्या माध्यमातून विदर्भ-मराठवाड्यात क्रांती, जीवनमानात बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 05:17 AM2019-06-24T05:17:33+5:302019-06-24T05:17:48+5:30
राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड (एनडीडीबीए) आणि सहायक मदर डेअरी फ्रूट्स अँड व्हेजिटेबल प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ व मराठवाड्यातील ग्रामीण दूध उत्पादकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
नागपूर : राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड (एनडीडीबीए) आणि सहायक मदर डेअरी फ्रूट्स अँड व्हेजिटेबल प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ व मराठवाड्यातील ग्रामीण दूध उत्पादकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे १० जिल्ह्यांमधील लोकांच्या जीवनात बदल घडून येत असल्याचे दिसून आले आहे. तेव्हा विदर्भ व मराठवाड्यात दुधामुळेच क्रांती घडून येईल, असा विश्वास राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डचे अध्यक्ष दिलीप रथ यांनी रविवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. त्यांनी आजवरच्या प्रगतीवरही समाधान व्यक्त केले.
दिलीप रथ यांनी सांगितले की, एके काळी सरकार दुभती जनावरे विकत घेण्यासाठी अनुदान देत होते, परंतु आता कुठल्याही अनुदानाशिवाय या १० जिल्ह्यातील तब्बल ८ हजारांवर शेतकऱ्यांनी स्वत:चा पैसा खर्च करून जनावरे विकत घेतली आहेत. दुधामुळे त्यांना लाभ दिसून येत आहे. सध्या विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, बुलडाणा, यवतमाळ व मराठवाड्यातील नांदेड, उस्मानाबाद, लातूर इत्यादींचा समावेश आहे. २०१६-१७ मध्ये कामाला सुरुवात झाली. पहिल्या वर्षी ४० हजार लीटर दूध संकलन करण्यात आले. २०१७-१८ मध्ये १ लाख ८० हजार लीटर आणि २०१८-१९ मध्ये २ लाख ८२ हजार ८७९ लीटर दूध एकत्रित करण्यात आले आहे. या वर्षी ३ लाख लीटर दूध संकलनाचे लक्ष्य आहे. ७ मार्च, २०१९ पर्यंत २३,७२७ दूध उत्पादक असून, २,२०८ गावांपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. १,१९० दूध संकलन केंद्रे आहेत. यात २९ टक्के महिलांची संख्या आहे, हे विशेष. ३१ मे, २०१९ पर्यंत दूध उत्पादकांना ४२७.५१ कोटी रुपये भरणा दिला गेला आहे. प्रत्येक महिन्यात जवळपास २१.६५ कोटी रुपये सरळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाते. सध्या नागपुरात दररोज १३,३३९ लीटर दूध दररोज विकले जात आहे.