मिल मजुराने बांधली दीक्षाभूमीवर विहीर

By admin | Published: October 21, 2015 03:11 AM2015-10-21T03:11:54+5:302015-10-21T03:11:54+5:30

कसल्याही पद्धतीच्या सुखदु:खाची चिंता न करता आंबेडकरी चळवळीसाठी कष्ट उपासणाऱ्यांची संख्या कमी नाही.

The mill worker built a well on the Dikshitbha Bhavan | मिल मजुराने बांधली दीक्षाभूमीवर विहीर

मिल मजुराने बांधली दीक्षाभूमीवर विहीर

Next

भागरथीबाई नंदेश्वर : मजुरीसोबतच बांगडी, कुंकू विकून उभा केला होता पैसा
सुमेध वाघमारे  नागपूर
कसल्याही पद्धतीच्या सुखदु:खाची चिंता न करता आंबेडकरी चळवळीसाठी कष्ट उपासणाऱ्यांची संख्या कमी नाही. यातीलच एक भागरथीबाई नंदेश्वर. एम्प्रेस मिलमध्ये कामगार म्हणून असलेल्या भागरथीबाईने मानवी सन्मानाच्या मार्गातील अवरोध म्हणजे विषमतेला कडाडून विरोध करीत जनमानसात बाबासाहेबांचे विचार पेरले. त्याकाळी पोटाला चिमटा देत पै-पै करून जमवलेल्या पैशातून दीक्षाभूमीवर येणाऱ्या लोकांची तहान भागविण्यासाठी स्वखर्चाने विहीर बांधून दिली.
'मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही', अशी गर्जना करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ साली लाखो दलित बांधवांसह बौद्ध धम्म स्वीकारला. या ऐतिहासिक क्रांतीने दलितांना स्वत्व आणि सत्त्व दोन्हीही दिलं. कर्मविपाकाच्या गाळात रुतलेल्या शोषितांच्या लढ्याला बळ दिलं. जगायला प्रयोजन दिलं. म्हणूनच भागरथीबाईसारख्या अनेक महिलांनी चळवळीच्या निखाऱ्यावर जळत, अपेक्षा न बाळगता समाजासाठी होईल ती मदत केली.
नागपुरातील खलासी लाईन येथे राहणाऱ्या भागरथीबाई एम्प्रेस मिलमध्ये कामगार होत्या. त्याकाळचे प्रसिद्ध दलित समाज सुधारक किसन फागू बनसोडे आणि जाईबाई चौधरी यांच्याशी त्यांची ओळख होती. यांच्या प्रभावातूनच त्या दलित चळवळीशी जुळल्या. आपल्या कामगार वस्तीतील अस्पृश्यांच्या वाईट चालीरीतींचा विरोध करून त्या टाकून देण्याचे त्या नेहमीच उपदेश द्यायच्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्ध धम्माने भागीरथीबाई प्रभावित झाल्या होत्या. समाजाला आपलेही काही देणं लागते म्हणून मोठ्या कष्टाने जमा केलेल्या पैशातून दीक्षाभूमीवर विहीर बांधून दिली. हा पैसा त्यांनी मिलमधील कामासोबतच बांगडी, कुंकू, शिकेकाई विकून उभा केला होता. तसेच भदंत आनंद कौसल्यायन याच्या बुद्धभूमीला जमीन विकत घेण्यासाठी म्हणून त्याकाळी ६०० रुपयांची देणगी दिली. त्याकाळी बाईने बांगड्याचा व्यवसाय करणे नवलाईचा विषय होता. पण महिला भागरथीबाईकडूनच बांगड्या भरून घेत, मात्र त्या बांगड्या भरून घेतल्यानंतर आंघोळ करून घेत असत. समाजातील पोटजाती, भेद नाहिसे व्हावे याकरिता भागरथीबाईंनी आपल्या मुलींचे विवाह इतर पोटजातीमध्ये केले. अस्पृश्यतेचे चटके सहन करणाऱ्या भागरथीबाईनी शेवटपर्यंत विषमतेच्या वाळवंटात समतेची कारंजी फुलविण्याचा प्रयत्न केला. विदर्भातील दलित चळवळीचा (डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणापर्यंत) शोध आर.एस.मुंडले धरमपेठ कॉलेजच्या समाजशास्त्राचे विभाग प्रमुख मोहन भानुदास नगराळे हे घेत आहेत. भागरथीबाई नंदेश्वर यांच्याबद्दलची ही माहिती त्यांनी उपलब्ध करून दिली आहे.

Web Title: The mill worker built a well on the Dikshitbha Bhavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.