मनरेगामध्ये कोट्यवधींचा घोटाळा ; विजय वडेट्टीवार यांचा बॉम्ब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 10:44 PM2018-09-13T22:44:19+5:302018-09-13T22:46:12+5:30
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंर्गत (मनरेगा) गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून निविदा प्रक्रिया न राबिवता मर्जीतील कंत्राटदारांकडून नियमबाह्य कामे सुरू आहेत. यात कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचे लेखा परीक्षणात स्पष्ट झाले आहे. असे असताना दोषींना पाठीशी घालण्याचे काम राज्य सरकार करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे विधिमंडळ उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंर्गत (मनरेगा) गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून निविदा प्रक्रिया न राबिवता मर्जीतील कंत्राटदारांकडून नियमबाह्य कामे सुरू आहेत. यात कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचे लेखा परीक्षणात स्पष्ट झाले आहे. असे असताना दोषींना पाठीशी घालण्याचे काम राज्य सरकार करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे विधिमंडळ उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.
ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळावा यासाठी मनरेगाचा निधी कुशल कामावर ५१ टक्के तर अकुशल कामावर ४९ टक्के खर्च करण्यात यावा, असे निकष आहेत. मात्र गडचिरोली जिल्ह्यात कुशल कामावर तब्बल ६२ टक्के तर अकुशल कामांवर ३८ टक्के निधी खर्च करण्यात आला आहे. जिल्ह्यातील वनविभागाला मनरेगाच्या कामांसाठी १३९ कोटींचा निधी शासनाकडून मंजूर झाला. यातील ८४ कोटी कुशल कामावर खर्च करण्यात आले. नियमबाह्य कामाची बोगस बिले सादर करून रक्कम उचलण्यात आल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.
वनविभागाच्या घोट व मार्कंडा क्षेत्रात कार्तिक कन्स्ट्रक्शन या एजन्सीच्या माध्यमातून कामे करण्यात आली. अधिकारी व एजन्सीच्या संगनमताने बोगस बिल सादर करून कोट्यवधीची रक्कम उचलण्यात आली. कुरखेडा सिंचन विभागातही असाच प्रकार सुरू आहे. ३ कोटी ४४ लाखापैकी २ कोटी ३२ लाख कुशल कामावर तर १ कोटी ११ लाखल अकुशल कामावर खर्च करण्यात आले. सिमेंटीकरणाच्या कामावर १० कोटी ५४ लाखांचा खर्च करण्यात आला. याची रक्कम उचलताना कृ षी केंद्राची बिले जोडण्यात आली. साहित्य खरेदीतही असाच घोटाळा आहे. लेखा परीक्षणातून हे स्पष्ट झाले असतानाही स्टेट फायनान्स अॅडव्हायजरी समितीचे प्रमुख राम बोंडे दोषींचा वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी कृती अहवाल सादर न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणात दोषीवर कारवाई करता येत नसल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. गडचिरोली प्रमाणे राज्यातील अन्य जिल्ह्यातही मनरेगात मोठ्या प्रमाणात भ्रष्टचार सुरू असल्याने या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.
मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर केलेले आरोप तथ्यहीन
आर्थिक घोटाळा करून भारतातून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या बरोबर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची बैठक झालेली नाही, तर काँग्रेसचाच यात हात असल्याचे वक्तव्य राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. त्यांनी कोणतीही माहिती न घेता काँग्रेसवर आरोप केले आहेत. पुराव्यानिशी त्यांनी सिद्ध करावे. तथ्यहीन आरोप करू नये असा सल्ला काँग्रेसचे विधिमंडळ उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी यावेळी दिला. मल्ल्या भारत सोडण्यापूर्वी अरुण जेटली यांना भेटले होते. तर नीरव मोदी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले होते. मल्ल्या व नीरव मोदी यांनी भाजपाच्या खात्यात कोट्यवधी रुपये जमा के ल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. राज्यात वृक्ष लागवड करण्यात आलेल्या १३ कोटी वृक्षापैकी ३ कोटीही वृक्ष जगलेले नाहीत. वृक्ष लागवड योजना अयशस्वी ठरल्याचे त्यांनी सांगितले.