दळण महागणार; लघु उद्योगांनाही विजेचा झटका, द्यावी लागणार इलेक्ट्रिसिटी ड्यूटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2022 08:00 AM2022-03-27T08:00:00+5:302022-03-27T08:00:02+5:30
Nagpur News विदर्भातील लघु उद्योगांना महावितरणने झटका दिला आहे. त्यावर इलेक्ट्रिसिटी ड्यूटीचा भार टाकण्यात आला आहे. त्यांना इलेक्ट्रिसिटी ड्यूटीच्या रूपात ७.५ टक्के अतिरिक्त भरावे लागणार आहेत.
कमल शर्मा
नागपूर : विदर्भातील लघु उद्योगांना महावितरणने झटका दिला आहे. त्यावर इलेक्ट्रिसिटी ड्यूटीचा भार टाकण्यात आला आहे. त्यांना इलेक्ट्रिसिटी ड्यूटीच्या रूपात ७.५ टक्के अतिरिक्त भरावे लागणार आहेत.
विदर्भ व मराठवाडा येथील उद्योगांना प्रोत्साहित करण्यासाठी राज्य सरकारद्वारे देण्यात येणाऱ्या १.८० रुपये प्रतियुनिट सबसिडीवर रोक लावण्यात आली आहे. सबसिटीसोबतच राज्य सरकारने लघु उद्योगांकडून २०२४ पर्यंत इलेक्ट्रिसिटी ड्यूटी न घेण्याचा निर्णय घेतला होता; परंतु मार्चमध्ये आलेल्या वीजबिलामध्ये इलेक्ट्रिसिटी ड्यूटी वसूल करण्यात आली आहे. यासंदर्भात विचारणा केल्यावर महावितरणने सांगितले की, मुख्य इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरने अनेक क्षेत्राला औद्योगिक श्रेणी देण्यास आपत्ती दर्शविली होती. त्यांचे म्हणणे आहे की, उत्पादन करणाऱ्यांनाच उद्योगाच्या श्रेणीत ठेवावे.
या आपत्तीनंतरच महावितरणने पुन्हा इलेक्ट्रिसिटी ड्यूटीचा बिलात समावेश केला. आता या लघु उद्योगांना सांगावे लागणार आहे की ते कसे उद्योगाच्या श्रेणीत येतात? इलेक्ट्रिसिटी ड्यूटी २०१९ मध्येच माफ करण्यात आली होती. त्यामुळे या निर्णयावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. आता लघु उद्योगांना चालू महिन्यात इलेक्ट्रिसिटी ड्यूटी भरावी लागणार आहे व गेल्यावेळेची थकीत रक्कमही भरावी लागणार आहे.
- दळण होईल महाग
पिठाची गिरणी, लॉन्ड्री, क्रशरबरोबरच अन्य व्यवसायांवर पुन्हा इलेक्ट्रिसिटी ड्यूटी लावण्यात आली आहे. पीठगिरणी चालकांनी याला विरोध दर्शविला आहे. त्यांचे म्हणणे आहे की इलेक्ट्रिसिटी ड्यूटी पुन्हा भरणे व थकीत भरणे म्हणजे वीजबिलात किमान १५ टक्क्यांची वाढ आहे. त्यामुळे दळणाचे दर वाढविण्यास विचार करावा लागेल.
- अधिकाऱ्यांकडे अर्धवट माहिती
यासंदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे अर्धवट माहिती आहे. त्यांचे म्हणणे आहे की, इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरच्या निर्देशावर ड्यूटी लावण्यात आली आहे; पण कुठल्या व्यवसायावर आपत्ती दर्शविण्यात आली आहे, यासंदर्भात त्यांच्याकडे माहिती नाही. अधिकाऱ्यांकडे म्हणणे आहे की, कनेक्शनधारकांना याची माहिती दिली जात आहे.
- नागपुरात २४ हजार कनेक्शन
नागपूर परिमंडळात औद्योगिक कनेक्शनची संख्या २४ हजारांवर आहे. यात ‘एचटी’चे १२४० व ‘एलटी’चे २३ हजारांच्या जवळपास कनेक्शन आहे. यातील किती कनेक्शनला पुन्हा इलेक्ट्रिसिटी ड्यूटी द्यावी लागेल, याची अधिकृत माहिती नागपूर कार्यालयाकडे नाही.