मायक्रोचीप करतेय लाखोंचा गोलमाल
By admin | Published: June 27, 2017 01:43 AM2017-06-27T01:43:52+5:302017-06-27T01:43:52+5:30
ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने भाजप नेता नवनीतसिंग तुली यांच्या मानकापुरातील रबज्योत आॅटोमोबाईल्स (पेट्रोप पंप) वर छापा मारून दोन मशिनला सील लावले.
भाजप नेता नवनीतसिंग तुली यांच्या पेट्रोल पंपावर छापा
दोन मशीन्स सील : ठाणे पोलिसांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने भाजप नेता नवनीतसिंग तुली यांच्या मानकापुरातील रबज्योत आॅटोमोबाईल्स (पेट्रोप पंप) वर छापा मारून दोन मशिनला सील लावले. पेट्रोल पंपावर एक इलेक्ट्रॉनिक मायक्रोचीप बसवून ती रिमोटद्वारे संचालित करीत ग्राहकांना चुना लावणारी एक टोळी ठाणे पोलिसांनी जेरबंद केली आहे. या टोळीतील आरोपींनी नागपुरातील काही पेट्रोल पंपांच्या संचालकांनाही ही चीप विकल्याचे सांगितल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे केवळ उपराजधानीतील पेट्रोल पंप संचालकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
राज्यात ९५ टक्के पंपांवर गोरखधंदा
ठाणे पोलिसांनी शेट्टी - नाईक जोडगोळीसह त्यांच्या साथीदारांना अटक केल्यानंतर राज्यातील ९५ टक्के पेट्रोलपंपांवर हा गोरखधंदा सुरू असल्याची माहिती त्यांनी सांगितली. ही माहिती ठाणे पोलिसांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालक सतीशचंद्र माथूर यांना देखील दिली. त्यांनी त्याची गंभीर दखल घेत या रॅकेटची पाळेमुळे उपटून फेकण्याचे आदेश दिले. या पार्श्वभूमीवर, नागपुरात सोमवारी कारवाई झाली. पुढच्या काही दिवसात पुन्हा अशाच प्रकारची कारवाई राज्यातील विविध ठिकाणच्या पेट्रोलपंपांवर होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. या कारवाईवर थेट मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांचे लक्ष राहणार असल्याने संबंधित गोरखधंद्यात गुंतलेल्यांचे धाबे दणाणले आहे.
कारवाई टाळणाऱ्यांचे बुरखे फाटले
विशेष म्हणजे, ज्या विभागाची या गोरखधंद्यावर कारवाई करण्याची जबाबदारी आहे, त्या वैधमापन शास्त्र विभागाला या कारवाईपासून पोलिसांनी दूर ठेवले आहे. हा विभागच पेट्रोल पंपावर मोजमाप व्यवस्थित आहे की नाही, त्या संबंधाचे प्रमाणपत्र देत असतो. परिणामी पेट्रोल चोरी करणारांवर कारवाई करण्याचा अधिकार असणाऱ्या अधिकाऱ्यांचे बुरखे फाटले आहे. अनेक पंपांवर पेट्रोल कमी मिळत असल्याच्या शेकडो ग्राहकांच्या नियमित तक्रारी आहेत. मात्र, त्याची दखलच घेतली जात नाही. कारवाईचा दबाव वाढल्यास तपासणीचा फार्स होतो. त्यामुळे पेट्रोल चोरीच्या या गोरखधंद्यात कारवाई करणारांचेही हात गुंतले असल्याचा आरोप होऊ लागला आहे. परिणामी या विभागाचे अधिकारीही अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, डोंबीवली (मुंबई) तील विवेक शेट्टी आणि पिंपरी चिंचवड येथील अविनाश नाईक यांच्या डोक्यातून पेट्रोल चोरीच्या गोरखधंद्याची क्लृप्ती निघाली अन् नंतर हा गोरखधंदा देशभरात सुरू झाला. एका सॉफ्टवेअर कंपनीत टेक्नीशियन असलेल्या नाईकला केवळ २० ते २२ हजार पगार मिळायचा. त्याने पेट्रोल पंपावर पेट्रोल चोरी करणारी चीप तयार केली. त्याचा प्रारंभीक प्रयोग शेट्टीच्या माध्यमातून मुंबईतील काही पेट्रोलपंपावर झाला. महिन्याला विनादिक्कत लाखो रुपये पदरात पडत असल्याचे पाहून हपापलेले अनेक पेट्रोल पंप संचालक या गोरखधंद्यात सहभागी झाले. मुंबईनंतर राज्यातील अनेक भागात अन् त्यानंतर उत्तरप्रदेशासह देशातील विविध प्रांतात हा गोरखधंदा फळलाफुलला. सारख्या तक्रारी मिळत असल्यामुळे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यराज यांनी या गोरखधंद्याचे मुळ शोधण्याचे आदेश संबंधित अधिका-यांना दिले. त्यानंतर उघड झालेल्या या गोरखधंद्याची व्याप्ती शोधण्यासाठी यूपी विशेष तपास पथक निर्माण करण्यात आले. अनेकांना अटक झाली त्यातूनच या गोरखधंद्याचे सूत्रधार विवेक शेट्टी आणि अविनाश नाईक असल्याचे पुढे आले. विशेष तपास पथकाने त्यांची गचांडी पकडून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रानिक्स चिप, रिमोट सेंसर, लॅपटॉप आणि अन्य चिजवस्तू जप्त केल्या. या दोघांच्या अटकेतून ठाणे पोलिसांचे लक्ष वेधले गेले. त्यांनीही शेट्टी-नाईकच्या टोळीतील अनेकांना जेरबंद केले. त्यानंतर ठाणे, मुंबई, नागपूरसह विविध शहरात हा गोरखधंदा बिनबोभाट सुरू असल्याचे पुढे आले. नागपुरातील मानकापूर परिसरात असलेल्या पेट्रोल पंपावरही हा गोरखधंदा सुरू असल्याचे सांगितल्याचे समजते. या माहितीच्या आधारे ठाण्याच्या गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आपल्या चार सहकाऱ्यांसह सोमवारी मानकापुरातील नवनीतसिंग तुली यांच्या पेट्रोल पंपावर धडकले. त्यांनी पंपाची तपासणी केली. येथे मायक्रोचीपच्या आधारे पेट्रोल चोरी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी येथील दोन मशिन्स सील केल्या. त्यानंतर उलटसुलट चर्चेला उधाण आले. सूत्रांच्या माहितीनुसार, वाहनचालकांना गंडविण्याचा हा गोरखधंदा अनेक दिवसांपासून सुरू आहे. विशेष म्हणजे, राज्यातील अन्य शहराच्या तुलनेत नागपुरात पेट्रोल चोरीचे प्रमाण कितीतरी जास्त असल्याचे पुढे आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार चौकशीदरम्यान एका मशिनमधून पाच लिटरमागे २०० मिलिलिटर आणि दुसऱ्या मशिनमधून २२० मिलिलिटर पेट्रोल कमी येत होते. आॅईल कंपन्यांच्या नियमानुसार प्रत्येक पाच लिटरमागे ५ मिलिलिटर ते २५ मिलिलिटरचा फरक स्वीकार्य ठरतो. मात्र, या पंपावर प्रतिलिटर ४० ते ४४ मिलिलिटर पेट्रोल ग्राहकांना कमी मिळत होते. पकडलेल्या रॅकेटने नागपुरातील अनेकांना ही मायक्रोचीप विकल्याची (बसवून दिली) माहिती आहे. त्याचमुळे ग्राहकांच्या खिशातील रक्कम बेमालूमपणे चोरण्याचा गोरखधंदा अनेक दिवसांपासून सुरू असल्याचे स्पष्ट होते.
ाहिन्याला १२ लाखांची पेट्रोलचोरी
पेट्रोल पंपाच्या मशिनमध्ये एक विशिष्ट प्रकारे चीप बसविली जाते. त्याचा रिमोट पंप संचालकाच्या खासमखास असलेल्या कर्मचाऱ्याच्या हातात असतो. पंपावर वाहनचालक पेट्रोल विकत घेत असताना पेट्रोल बाहेर काढणारी मशिन आणि मिटर सुरू राहते. मात्र, ज्याच्या हातात रिमोट असतो, तो कर्मचारी किंवा व्यक्ती बेमालूमपणे हातचलाखी करून ग्राहकाला १० ते २० टक्के कमी पेट्रोल देऊन गंडवित असतो. ही चीप मशिनमध्ये बसविल्यानंतर एका पंपावर रोज एक हजार ग्राहक किमान एक लिटर पेट्रोल घेत असेल तर त्याला ८०० ते ९०० मिलिलिटर दिले जाते. अर्थात १०० रुपयांचे पेट्रोल मागणारांची फसवणूक करून त्याला १० ते २० रुपयांचा गंडा घातला जातो. म्हणजेच एका पंपावर दोन लाखांचे पेट्रोल वितरित करण्याऐवजी ग्राहकाशी दगाबाजी करून १ लाख ६० हजार ते १ लाख ८० हजारांचेच पेट्रोल दिले जाते. सरासरी २० ते ४० हजारांची दांडी रोज मारली जाते. म्हणजेच ही चीप बसविल्यानंतर पेट्रोल चोरी करून महिन्याला किमान ६ ते १२ लाख रुपयांचा मलिदा चीप बसविणारा पेट्रोल पंप चालक कमवितो.