नागपुरात मनोरंजन केंद्राच्या नावाआड लाखोंचा जुगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 11:57 PM2018-03-12T23:57:41+5:302018-03-12T23:57:53+5:30
मनोरंजन केंद्राच्या नावाआड जुगार भरवून लाखोंची हार-जित करणाºया एका हायटेक जुगार अड्ड्यावर सोमवारी रात्री ७ च्या सुमारास पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी नाट्यमयरीत्या छापा घातला. त्यांनी येथे जुगार खेळणाºया २७ जुगाऱ्यांना पकडले. त्यांच्याकडून १ लाख ४८ हजार १३० रुपये तसेच एक कार आणि चार दुचाकी व ३० पेक्षा जास्त मोबाईलसह सात ते आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. यावर्षीची जुगार अड्ड्यावरची आतापर्यंतची ही सर्वात मोठी आणि धाडसी कारवाई ठरली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनोरंजन केंद्राच्या नावाआड जुगार भरवून लाखोंची हार-जित करणाऱ्या एका हायटेक जुगार अड्ड्यावर सोमवारी रात्री ७ च्या सुमारास पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी नाट्यमयरीत्या छापा घातला. त्यांनी येथे जुगार खेळणाऱ्या २७ जुगाऱ्यांना पकडले. त्यांच्याकडून १ लाख ४८ हजार १३० रुपये तसेच एक कार आणि चार दुचाकी व ३० पेक्षा जास्त मोबाईलसह सात ते आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. यावर्षीची जुगार अड्ड्यावरची आतापर्यंतची ही सर्वात मोठी आणि धाडसी कारवाई ठरली आहे.
सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत छोटा ताजबाग (रघुजीनगर) परिसरात फुलसिंग नाईक क्रीडा मंदिरद्वारा संचालित क्रीडा व मनोरंजन केंद्र चालविले जाते. केंद्राच्या संचालन समितीत राजेश कडू (अध्यक्ष), राजू चहांदे (उपाध्यक्ष), सूर्यकांत चौरसिया (सचिव) आणि दामोदर कुहीकर या केंद्राचे कोषाध्यक्ष असून, किसना निखारे, मोहम्मद जमील आणि प्रफुल्ल तडवेकर या केंद्राचे सदस्य आहेत. वरकरणी या केंद्रात क्रीडा आणि मनोरंजन चालते, असे सांगितले जात असले तरी तेथे रोज लाखोंची हार-जित करणारा जुगार चालतो, अशी माहिती पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांना कळली. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना येथे पाळत ठेवण्यास सांगितले. आज रात्री ७ च्या सुमारास आतमध्ये मोठा जुगार सुरू असल्याचे खात्रीलायक वृत्त कळताच तेथे उपायुक्त भरणे यांंनी सहकाऱ्यांसह छापा घातला. आतमध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल २७ जुगारी जुगार खेळताना आढळले.
अशीही बनवाबनवी
पोलिसांनी छापा घालताच जुगाऱ्यांनी आम्ही पैशाची हार-जित नव्हे तर कॉईन(पॉर्इंट)च्या आधारे मनोरंजन करीत असल्याचा कांगावा केला. मात्र, पोलिसांचा छापा पडताच केंद्राबाहेर असलेल्या ताज पान पॅलेसच्या संचालकाची धावपळ संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याची चौकशी केली. त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, जुगारात वापरले जाणारे कॉईन अन् चिठ्ठ्या आढळल्याने पोलिसांनी त्याला विचारणा केली असता, हे सर्व केंद्रात चालणाऱ्या जुगार अड्ड्याशी संबंधित असल्याचे त्याने सांगितले. बनवाबनवी उघड झाल्यामुळे जुगाऱ्यांचा कांगावाही बंद झाला. त्यांनी मनोज जैन आणि सूर्यकांत चौरसिया हे या केंद्राचे (अड्ड्याचे) प्रमुख असल्याचे पोलिसांना सांगितल्याचे समजते.
वैशिष्ट्यपूर्ण कारवाई
डीसीपी भरणे यांनी केलेली ही कारवाई वैशिष्ट्यपूर्ण आहे. आजपर्यंत अनेक क्लब आणि जुगार अड्ड्यावर कारवाई केली. गेल्या आठवड्यातही इमामवाड्यात अशीच कारवाई झाली. मात्र, त्यात रोख रक्कम जमा करणारा आरोपी सापडला नव्हता. यावेळी जुगाऱ्यांना पकडण्यासोबतच त्यांच्याकडून रोख रक्कम घेणारा पानटपरीचालकही पोलिसांनी पकडला. क्लबच्या समोरच ही पानटपरी आहे. जुगार खेळणारे आधी त्या पानटपरीवर आपली रक्कम जमा करायचे, नंतर तेथून रोख रकमेच्या बदल्यात टोकन घ्यायचे. या टोकनचीच हार-जित होत होती. जेवढे ज्याने टोकन जिंकले. त्या टोकनच्या किमतीनुसार त्याला पानटपरीवर रक्कम मिळत होती.
दारू, बिर्यानी अन् गाद्याही
मनोरंजन केंद्राच्या नावाखाली चालणाऱ्या या जुगार अड्ड्यावर रात्रभर जुगार चालत होता. शहरातील तसेच शहराबाहेरचे अनेक कुख्यात जुगारी येथे एका रात्रीत लाखोंचे डाव लावत होते. जुगाऱ्यांसाठी या अड्ड्यावर दारू, बिर्यानी अन् झोपण्यासाठी गाद्या तर मनोरंजनासाठी सीडीही होती. पोलिसांनी येथून निलचित्रा(ब्ल्यू फिल्म)च्या सीडी जप्त केल्याचेही पोलीस उपायुक्त भरणे यांनी पत्रकारांना सांगितले. या धाडसी कारवाईमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून, क्लबच्या नावाखाली उपराजधानीत चालणाऱ्या अनेक गोरखधंद्याचा आता पर्दाफाश होण्याचीही शक्यता बळावली आहे.
अड्ड्यावर पकडले गेलेले
शेख नूर शेख जहीर (४५, रा. ताजबाग), इमाम कुरेशी शेख अयुब मरुम (३२, रा. आझाद कॉलनी झोपडपट्टी), शेख सलीम मरुम शेख सफीक (४५, रा. गिट्टीखदान झोपडपट्टी), शेख गौस शेख साकीर (२३, रा. ठाकूर प्लॉट, मोठा ताजबाग), शेख मुमताज कुरेशी (रा. मोठा ताजबाग), शेख शाबीद शेख युसूफ (३९, आझाद कॉलनी, मोठा ताजबाग), चरण गौर (४९, रा. पाचपावली), शेख मुस्ताक कुरेशी (रा. सक्करदरा), शाहीद वजीर जडिया (रा. हिंगणा), बंडू आडे (रा. एमआयडीसी), सिद्धार्थ खोब्रागडे (४०, रा. जाटतरोडी), धनंजय आष्टीकर (रा. काटोल रोड, गिट्टीखदान), शेख अख्तर शेख जहीर कुरेशी (रा. न्यू म्हाळगीनगर), शेख इक्बाल शेख यासीन (रा. सक्करदरा), विशाल मानके (रा. सक्करदरा), शेख शाहीद शेख जहीर (रा. सक्करदरा), मो. अशफाक (रा. न्यू म्हाळगीनगर), मुश्ताक अली (रा. सक्करदरा), ऋषी नंदनवार (रा. गंगाबाग, पारडी), सचिन गिरी (रा. लालगंज, खैरीपुरा), किसना डोमाजी निखारे (२६, रा. जुनी मंगळवारी, लकडगंज), शेख फारुक शेख मेहमूद (३६, रा. ताजबाग), अयाज खान (३५, रा. ताजबाग), शेख मुस्ताक शेख जहीर (३०, रा. ताजबाग), शेख इमा शेख जहीद (२९, रा. ताजबाग), मनोज ग्यानचंद जैन (४२, रा. वर्धमाननगर) आणि सूर्यकांत चौरसिया (४५, रा. सीताबर्डी) या २७ जणांना पोलिसांनी जुगार अड्ड्यावरून ताब्यात घेतले. वृत्त लिहिस्तोवर अटकेची कारवाई सुरू होती.