उमेदवारांची कोटीच्या कोटी उड्डाणे... २७ टक्के उमेदवार आहेत कोट्यधीश

By योगेश पांडे | Published: November 12, 2024 05:00 PM2024-11-12T17:00:44+5:302024-11-12T17:15:50+5:30

सर्वाधिक श्रीमंत उमेदवाराकडे १५४ कोटींची संपत्ती : २२ % उमेदवार लाखाच्या आत

Millions of flights of candidates... 27 percent of candidates are millionaires | उमेदवारांची कोटीच्या कोटी उड्डाणे... २७ टक्के उमेदवार आहेत कोट्यधीश

Millions of flights of candidates... 27 percent of candidates are millionaires

योगेश पांडे 
लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर:
विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्ष व उमेदवारांकडून पूर्ण ताकद पणाला लावण्यात आली आहे. यंदा नागपूरच्या रिंगणात धनाढ्य उमेदवारांची संख्या वाढली असून, तब्बल २७ टक्के उमेदवारांची संपत्ती एक कोटी किंवा त्याहून अधिक आहे. सर्वाधिक श्रीमंत उमेदवार अपक्ष असून, त्याची संपत्ती तर १५४ कोटी इतकी आहे. दुसरीकडे २२ टक्के उमेदवारांची मालमत्ता एका लाखाच्या आत आहे. 


निवडणूक आयोगातर्फे उमेदवारांच्या मालमत्तेचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे. 'लोकमत'ने उपलब्ध शपथपत्रांची विस्तृत पाहणी केली असता वरील बाब समोर आली आहे. नागपूरमध्ये सहाही मतदारसंघातून एकूण ११७ उमेदवार रिंगणात आहेत. यातील ३२ उमेदवारांची संपत्ती एक कोटी किंवा त्याहून अधिक आहे. कोट्यधीशांपैकी ११ जणांची संपत्ती, तर पाच कोटींहून अधिक असून, दोन उमेदवारांची मालमत्ता ५० कोटींहून जास्त आहे.


याशिवाय २६ उमेदवारांची मालमत्ता एक लाख किंवा त्याहून कमी आहे. दोन जणांकडे काहीच मालमत्ता नसल्याचे त्यांनी शपथपत्रात नमूद केले आहे. काही जणांची मालमत्ता तर १५ हजारांच्या आतदेखील आहे.


१३ अपक्ष कोट्यधीश 
नागपुरातील सर्वांत जास्त संपत्ती असलेला उमेदवार अपक्ष आहे. १३ अपक्षांची संपत्ती एक कोटी किंवा त्याहून अधिक आहे. मात्र, एकूण कोट्यधीशांमध्ये राजकीय पक्षांच्याच उमेदवारांचे प्रमाण जास्त आहे. उमेदवार तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या स्थावर व जंगम मालमत्ता विचारात घेऊन एकूण मालमत्ता दर्शविण्यात येते, हे विशेष.


३७ टक्के उमेदवारांचे उत्पन्न 'शून्य'
तब्बल ४४ (३७ टक्के) उमेदवारांनी त्यांचे वार्षिक उत्पन्न हे निरंक म्हणजेच दाखविले आहे. तर एका उमेदवाराने त्याचे वार्षिक उत्पन्न १ हजार १६० रुपये दाखविले आहे. अशा स्थितीत हे उमेदवार तांत्रिकदृष्ट्या बीपीएल' गटात मोडायला हवेत. २७ उमेदवारांचे उत्पन्न ५ लाख ते १० लाखांच्या दरम्यान आहेत. ३ उमेदवारांचे उत्पन्न वार्षिक ५० लाखांहून अधिक असून दोघांचे उत्पन्न एक कोटीहून जास्त आहे. 


उत्तर, पश्चिममध्ये सर्वाधिक कोट्यधीश
नागपूर उत्तर व नागपूर पश्चिम मतदारसंघात सर्वाधिक प्रत्येकी कोट्यधीश उमेदवार आहेत. त्याखालोखाल दक्षिणमध्ये सहा पूर्वमध्ये पाच, तर दक्षिण-पश्चिममध्ये तीन उमेदवारांची संपत्ती एक कोटीहून अधिक आहे. दक्षिण व पश्चिम नागपुरातील प्रत्येकी सहा उमेदवारांची मालमत्ता एका लाखाहून कमी आहे. तर दक्षिण पश्चिम व मध्यमधील प्रत्येकी चौघे उमेदवार या मालमत्ता गटात मोडतात. 


उमेदवारांची एकूण मालमत्ता
मालमत्ता                                 उमेदवारांची संख्या

१ लाखाहून कमी                              २६ 
१ लाख ते १० लाख                           २७ 
१० लाख ते २५ लाख                         १० 
२५ लाख ते ५० लाख                         ८ 
५० लाख ते १ कोटी                          १४ 
एक कोटीहून अधिक                        २१ 
पाच कोटींहून अधिक                        ११


उमेदवारांचे वार्षिक उत्पन्न 
वार्षिक उत्पन्न                             उमेदवारांची संख्या 

शून्य                                                   ४४ 
१ ते १ लाख                                           १ 
१ लाख ते ५ लाख                                 २७ 
५ लाख ते १० लाख                               २८ 
१० लाख ते २५ लाख                              ६ 
२५ लाख ते ५० लाख                              ६ 
५० लाख ते १ कोटी                                ३ 
एक कोटीहून अधिक                              २

Web Title: Millions of flights of candidates... 27 percent of candidates are millionaires

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.