सेवाग्राम एक्स्प्रेसमधील लाखोंचे पार्सल पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 12:58 AM2018-06-02T00:58:24+5:302018-06-02T00:58:36+5:30
धावत्या रेल्वेगाडीत शौचालयाचे प्लायवूड हटवून लीज पार्सल बोगीतून लाखोंचे महागडे पार्सल अज्ञात आरोपींनी पळविल्याची घटना शुक्रवारी सेवाग्राम एक्स्प्रेसमध्ये घडली. ही गाडी नागपुरात पोहोचल्यानंतर सील, कुलूप जसेच्या तसे होते. परंतु बोगी उघडताच पार्सलच्या बॅग फाटलेल्या आणि अस्ताव्यस्त पडलेल्या दिसल्या. यातील काही बॅग तर रिकाम्या आढळल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धावत्या रेल्वेगाडीत शौचालयाचे प्लायवूड हटवून लीज पार्सल बोगीतून लाखोंचे महागडे पार्सल अज्ञात आरोपींनी पळविल्याची घटना शुक्रवारी सेवाग्राम एक्स्प्रेसमध्ये घडली. ही गाडी नागपुरात पोहोचल्यानंतर सील, कुलूप जसेच्या तसे होते. परंतु बोगी उघडताच पार्सलच्या बॅग फाटलेल्या आणि अस्ताव्यस्त पडलेल्या दिसल्या. यातील काही बॅग तर रिकाम्या आढळल्या. रेल्वे सुरक्षा दल आता चोरी गेलेल्या साहित्याची माहिती गोळा करत आहे. त्यानंतरच लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल होऊ शकणार आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वेत पार्सलच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वीरेंद्र कुमार सिंह यांच्या अशोक एअरवेज कंपनीचे नागपुरात मोहननगर, टेंटलाईनमध्ये कार्यालय आहे. या कार्यालयाचे प्रमुख रुपदेव सिंह यांना कंपनीने रेल्वे लीज पार्सल बोगीसाठी अधिकृत केले आहे. रुपदेव सिंह यांच्यासाठी सेवाग्राम एक्स्प्रेसची लीज पार्सल बोगीतून पाच कंपन्या आणि एका अन्य व्यक्तीसाठी वेगवेगळ्या पार्सल बॅग गुरुवारी मुंबईवरून नागपूरला रवाना झाल्या. सेवाग्राम एक्स्प्रेस सकाळी ७.३० वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक ७ वर पोहोचली. रुपदेवसिंह यांच्यानुसार येथे त्यांच्या मुलाने लीज पार्सल बोगीला अटेंड केले. दरम्यान बोगीला कुलूप लागलेले होते आणि त्यावर मुंबई आरपीएफने लावलेले सील होते. परंतु बोगी उघडताच आतील पार्सल अस्ताव्यस्त पडलेले होते. बहुतांश पार्सल बॅगमध्ये नव्हते. लीज पार्सल बोगीत श्री मारुती कुरिअर, श्री अंजनी कुरिअर, मोनोपोली कुरिअर, मारुती एअर कुरिअर, प्रोफेशनल कुरिअर आणि प्रशांत नावाच्या व्यक्तीची पार्सल बॅग होती. या पार्सल बॅगमध्ये कॉम्प्युटर, मोबाईल, पडद्याचे कपडे, इतर कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तु आदी साहित्य होते. यातील बहुतांश साहित्य बोगीतून पळविण्यात आले होते. लीज पार्सल बोगीच्या बाजूला असलेल्या शौचालयाचे प्लायवुड हटवून बोगीत प्रवेश करीत चोरट्यांनी पार्सल चोरल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. आरपीएफतर्फे ‘जॉईंट नोट’ तयार करण्यात येत असून ‘जॉईंट नोट’ शनिवारी मिळाल्यानंतर लोहमार्ग पोलिसात तक्रार करण्यात येणार असल्याचे रुपदेवसिंह यांनी सांगितले. यात लाखो रुपयांचे साहित्य पळविण्यात आल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.
पार्सल बोगीतील चोऱ्या थांबेनात
रेल्वेच्या लीज पार्सल बोगीत चोरीच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. यापूर्वीही वाधवानी नावाच्या एजंटसाठी बुक केलेले साहित्य शौचालयाचे प्लायवूड हटवून चोरी करण्यात आले होते. तरीसुद्धा अशा घटना रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलीस गंभीर नसल्याचे दिसत आहे. सेवाग्राम एक्स्प्रेसच्या घटनेबाबत रेल्वे सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाºयांपासून जवानांपर्यंत विचारणा केली असता त्यांनी टाळाटाळ केली.