‘शक्ती वाहिनी’त फसले लाखो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 01:55 AM2017-09-14T01:55:20+5:302017-09-14T01:56:06+5:30

झिंगाबाई टाकळी परिसरातील ‘शक्ती वाहिनी’ या पतसंस्थेने डेली कलेक्शन, आरडी व मुदतठेवीच्या माध्यमातून लाखो रुपये गोळा केले आहेत. मात्र, गेल्या २५ दिवसांपासून पतसंस्थेचे कार्यालय बंद आहे.

Millions of people in 'Shakti Vahini' | ‘शक्ती वाहिनी’त फसले लाखो

‘शक्ती वाहिनी’त फसले लाखो

Next
ठळक मुद्देपतसंस्थेचे कार्यालय २५ दिवसांपासून बंद

व्यवस्थापक विजय भोयर बेपत्ता
खातेधारकांचे लाखो रुपये संकटात

कमलेश वानखेडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : झिंगाबाई टाकळी परिसरातील ‘शक्ती वाहिनी’ या पतसंस्थेने डेली कलेक्शन, आरडी व मुदतठेवीच्या माध्यमातून लाखो रुपये गोळा केले आहेत. मात्र, गेल्या २५ दिवसांपासून पतसंस्थेचे कार्यालय बंद आहे. खातेधारकांना त्यांची रक्कम मिळेनाशी झाली आहे. पतसंस्थेचा व्यवस्थापक विजय भोयर बेपत्ता आहे. विशेष म्हणजे त्याच्या कुटुंबीयांनी भोयर हरविला असल्याची तक्रार मानकापूर पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांकडून भोयरचा शोध घेण्यात चालढकल होत आहे. त्यामुळे एकूणच सर्व प्रकरण संशयाच्या भोवºयात आहे. कष्टाचा एक एक पैसा गोळा करून गुंतवणूक करणाºया हजारो ग्राहकांचे यामुळे टेन्शन वाढले आहे.

झिंगाबाई टाकळी, गोधनी रोडवर पांडुरंग कार्यालयाच्या मागे ‘शक्ती वाहिनी नागपूर शहर महिला स्वयंसहाय्यता गटाची पतसंस्था मर्यादित’ (रजि.नं. एन.जी.पी./सी.टी.ए.२/आर.एस.आर./सी.आर./७१४/२००२) ही पतसंस्था २०१२ मध्ये सुरू झाली. संबंधित पतसंस्थेतर्फे ग्राहकांकडून डेली कलेक्शन, दरमहा आरडी व मुदतठेवी स्वीकारल्या जात होत्या. विजय जनार्दन भोयर या पतसंस्थेचा संस्थापक असून, तो या पतसंस्थेत व्यवस्थापक म्हणून काम करायचा. विशेष म्हणजे तो स्वत: डेली कलेक्शनचेही काम करायचा. संस्थेच्या अध्यक्ष प्रतिभा राजू वैद्य या आहेत. त्या स्वत: पतसंस्थेत कॅशिअर म्हणून काम करायच्या. याशिवाय संस्थेत तीन कर्मचारी व तीन डेली कलेक्शन एजंट कार्यरत होते. ग्राहकांच्या मते, या पतसंस्थेतील सर्व कारभार व्यवस्थापक भोयर याच्या मतानुसार चालायचा. अध्यक्ष वैद्य या त्याच्या निर्णयात सहभागी असायच्या.
पतसंस्थेत हजारावर खातेधारक आहेत. अनेकांनी डेली कलेक्शन खात्यात दररोज १०० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत रक्कम जमा केली आहे. अनेकांनी
लाखो रुपयांचे फिक्स डिपॉझिट केले आहे. गेल्या चार-पाच महिन्यांपासून पतसंस्थेतील आर्थिक शिस्त बिघडली होती. खातेधारकांना त्यांनी जमा केलेली रक्कम परत देण्यास टाळाटाळ केली जात होती. १६ आॅगस्ट २०१७ रोजी पतसंस्था सुरू होती. त्यादिवशी डेली कलेक्शनची रक्कम स्वीकारण्यात आली. १७ आॅगस्टच्या सुटीनंतर १८ आॅगस्टपासून पतसंस्थेचे कार्यालय उघडलेच नाही. खातेधारकांनी कर्मचाºयांकडे चौकशी केली असता व्यवस्थापक भोयर बेपत्ता असल्याचे कळले. काही खातेधारकांनी पतसंस्थेत ठेवलेली आपली रक्कम मिळावी म्हणून मानकापूर पोलिसात तक्रारही दाखल केली. मात्र, भोयर बेपत्ता असल्यामुळे कुणालाही त्यांचे पैसे परत मिळाले नाही. खातेधारक दररोज पतसंस्थेत धडकतात, पण कार्यालय बंद पाहून ते निराश होऊन परततात.
बुधवारी (१३ सप्टेंबर) खातेधारकांनी एकत्रित येत पतसंस्थेच्या कार्यालयावर धडक दिली. त्यावेळी भोयर याने केलेल्या फसवणुकीची अनेक उदाहरणे समोर आली. झिंगाबाई टाकळी परिसरातील चक्रधर नान्हे यांनी १३ लाख २१ हजार रुपयांच्या ठेवी पतसंस्थेत ठेवल्या आहेत. जुलै २०१७ मध्ये मुदत संपली. त्यांनी पैशाची मागणी केली असता, व्यवस्थापक भोयर याने टाळाटाळ केली; नंतर १४ आॅगस्ट रोजी निर्मल अर्बन को-आॅप. बँकेचे वेगवेगळे चेक दिले. मात्र खात्यात पैसेच नसल्यामुळे चेक बाऊन्स झाले. नान्हे यांनी भोयर याचे घर गाठले असता, तो बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नान्हे यांनी २१ आॅगस्ट रोजी मानकापूर पोलिसात व्यवस्थापक भोयर याने आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली. एम.बी. टाऊन येथील रहिवासी साधना संजय बडवाईक यांनी दरमहा एक हजार रुपयांप्रमाणे ४२ महिने पैसे जमा केले. याशिवाय ५० हजार ६०६ रुपयांचे फिक्स डिपॉझिटही केले. त्यांनाही त्यांची रक्कम मिळाली नाही. १ सप्टेंबर रोजी त्यांनीही मानकापूर पोलिसात तक्रार दाखल केली. फसवणूक झालेल्या खातेधारकांची यादी बरीच मोठी आहे.
आईने दिली बेपत्ता असल्याची तक्रार
व्यवस्थापक विजय भोयर याची आई कमलाबाई भोयर या पतसंस्थेत उपाध्यक्ष आहेत. त्यांनी विजय हरविला असल्याची तक्रार १९ आॅगस्ट रोजी मानकापूर पोलिसात दिली आहे. विजय याने अद्याप घरच्यांशी संपर्क साधलेला नाही, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे.
मानकापूर पोलिसांचा तपास थंड
खातेधारकांनी मानकापूर पोलिसांकडे चौकशी केली असता, आम्ही विजय भोयर याचा शोध घेत आहोत, असे उत्तर पोलिसांकडून दिले जात आहे. मात्र, विजय याचे कॉल डिटेल्स तपासले का, त्याच्याशी संबंधित लोकांशी चौकशी केली का, नागरिकांचे लाखो रुपये गोळा करून बेपत्ता असलेला भोयर याला शोधून काढण्यात एवढी दिरंगाई का होत आहे, असे प्रश्न खातेधारकांनी उपस्थित केले आहेत. भोयर बेपत्ता असल्याचे कळल्यानंतर अनेकांनी पोलीस ठाणे गाठून, आपले पैसे पतसंस्थेत अडकले असल्याची तक्रार केली. मात्र, दिलेल्या तक्रारीची मानकापूर पोलिसांनी साधी ‘रिसिव्ह’ही दिली नाही, अशी महिला खातेधारकांची तक्रार आहे. आम्हाला विचारून तुम्ही पैसे गुंतवले का, अशी उलट उत्तरे पोलिसांकडून मिळल्याने खातेधारक संतप्त आहेत. याप्रकरणी मुख्यमंत्री व पोलीस आयुक्तांकडे दाद मागण्याची तयारी खातेधारकांनी चालविली आहे.
जिल्हा उपनिबंधकांकडून चौकशीही नाही
‘शक्ती वाहिनी’ पंतसंस्थेच्या कार्यालयाला कुलूप लागले असून आर्थिक व्यवहार बंद करण्यात आले आहेत. हजारो ग्राहकांचे लाखो रुपये पंतसंस्थेकडे अडकलेले आहेत. याची चौकशी करावी, अशी मागणी करणारी तक्रार खातेधारकांनी २१ आॅगस्ट रोजी जिल्हा उपनिबंधकांकडे केली. मात्र, त्यांनी या तक्रारीची दखल घेऊन साधी चौकशीही केली नाही. बँकेच्या चौकशीसाठी उपनिबंधक कार्यालयातून आजवर एकही कर्मचारी चौकशीसाठी आलेला नाही. त्यामुळे खातेधारकांमध्ये रोष वाढला आहे.

Web Title: Millions of people in 'Shakti Vahini'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.