व्याघ्रसंवर्धनावर कोटींचा खर्च, फुलपाखरे मात्र वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 10:18 AM2020-07-27T10:18:43+5:302020-07-27T10:21:02+5:30

एका प्रवर्गात मोडूनही जो सन्मान वाघांच्या नशिबात आहे, तो फुलपाखरांच्या नशिबात मात्र नाही. वाघ मारल्यावर कठोर सजा होते, मात्र फुलपाखरे मारल्यावर कुणालाही सजा झाल्याची नोंद नाही.

Millions spent on tiger breeding, but butterflies on the wind | व्याघ्रसंवर्धनावर कोटींचा खर्च, फुलपाखरे मात्र वाऱ्यावर

व्याघ्रसंवर्धनावर कोटींचा खर्च, फुलपाखरे मात्र वाऱ्यावर

Next
ठळक मुद्देफुलपाखरांच्या नशिबी सन्मान नाहीदोघेही ‘शेड्युल वन’मध्ये

गोपालकृष्ण मांडवकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाघ, अजगर या प्राण्यांसोबतच ‘चांदवा’ हे फुलपाखरू वन विभागाच्या शेड्यूल वनमध्ये मोडते. या प्रवर्गात मोडणाऱ्या प्राण्यांच्या संगोपनासाठी आणि त्यांना जगता यावे यासाठी वन विभागाचे कायदे आहेत. मात्र एका प्रवर्गात मोडूनही जो सन्मान वाघांच्या नशिबात आहे, तो फुलपाखरांच्या नशिबात मात्र नाही. वाघ मारल्यावर कठोर सजा होते, मात्र फुलपाखरे मारल्यावर कुणालाही सजा झाल्याची नोंद नाही.
‘चांदवा’चा विदर्भातही मोठा वावर आहे. मात्र त्याच्या संवर्धनाच्या दृष्टीने वन विभागाकडून फारसे प्रयत्न झाले नाहीत. महाराष्ट्र सरकारने भारतात पहिल्यांदा ‘राणी पाकोळी’ या फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून जाहीर करून पुढाकार घेतला. त्यासाठी राखीव उद्यान विकसित करण्यासाठी म्हणावा तसा वेग दिसत नाही. नागपूर आणि चंद्रपुरातील बॉटनिकल गार्डनमध्ये फुलपाखरू उद्यान विकसित करण्याची योजना असली तरी त्यातही फारशी भर पडलेली नाही. अमरावतीमध्ये २०१३ मध्ये सामाजिक वनिकरण विभागाच्या माध्यमातून फुलपाखरू उद्यान उभारण्यात आले. मात्र अलिकडे त्याची एवढी दूरवस्था झाली की हे कामच आता थांबले आहे.

पर्यावरण असंतुलनामुळे ऱ्हास
पर्यावरण असंतुलनामुळे फुलपाखरांचा ऱ्हास होत आहे. कोणत्या झाडावर कोणते फुलपाखरू अंडी घालते, हे निसर्गनियमाप्रमाणे ठरले आहे. रस्ता रुंदीकरणासारख्या कामात देशी झाडे तोडल्यावर कडूबदाम, सप्तपर्णी, करंजी आदी झाडे लावली जातात. त्यामुळे जन्मसाखळी तुटते. फुलपाखरांच्या आजवरच्या अध्ययनानुसार आवश्यक झाडे लावली तर ही साखळी वेग धरू शकेल.

चीनमध्ये तस्करी
फुलपाखरांना पकडून त्यांची आसाममधून चीनला तस्करी होत असल्याचा प्रकार यापूर्वी उघडकीस आला आहे. तिथे फुलपाखरांचे पारदर्शी कि-चेन तयार केले जाते. त्यासाठी लक्षावधी फुलपाखरे मारली जातात. जाळी लावून फुलपाखरे पकडली जातात. मात्र कुणावरही कारवाई होत नाही.

फुलपाखरांसाठी राज्याचा अ‍ॅक्शन प्लॅन नाही. कायदा, वनसंवर्धन आणि फुलपाखरू यांचा मेळ अद्याप बसलेला दिसत नाही. त्यांना कायद्याचे योग्य ते संरक्षण मिळायला हवे.
- यादव तरटे पाटील, सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ

भारतात १,५०३ फुलपाखरे
जगात १७,८२१ इतकी फुलपाखरे असून अलिकडच्या आकडेवारीनुसार भारतात १,५०३ फुलपाखरे आहेत तर महाराष्ट्रात २७७ फुलपाखरांच्या प्रजाती आहेत. विदर्भात १८७ प्रजाती तर मेळघाटात एकूण १२७ प्रकारची फुलपाखरे आढळतात. मेळघाट, ताडोबा, पेंच व इतर जंगल परिसरात २० ते २५ फुलपाखरांच्या प्रजाती सहज आढळतात.

 

Web Title: Millions spent on tiger breeding, but butterflies on the wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.