'शैतान' आणि 'भीमा'च्या झुंजीवर लागली होती लाखोंची पैज; पोलिसांनी उधळला डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2022 07:15 AM2022-06-21T07:15:00+5:302022-06-21T07:15:01+5:30
Nagpur News रेड्यांची झुंज होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर नागपूर जिल्ह्यात कळमेश्वर पोलिसांनी धाड टाकून हा डाव उधळून लावला.
नागपूर : राऊळगाव (ता. कळमेश्वर) शिवारात शैतान आणि भीमा नावाच्या रेड्यांची झुंज होणार होती. यासाठी लाखो रुपयांची शर्यत लावण्यात आली होती. याप्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी १८ आरोपींना अटक केली असून उर्वरित १० जणांचा शोध घेतला जात आहे. कळमेश्वर पोलिसांनी या कारवाईत २९ लाख ८३ हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.
गुप्त माहितीच्या आधारावर कळमेश्वर पोलिसांनी रविवारी सायंकाळी राऊळगाव शिवारात धाड टाकून जुगाऱ्यांचा हा डाव उधळून लावला.
प्राप्त माहितीनुसार या शर्यतीसाठी १२ जून रोजी ‘राजा’ नावाचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आला होता. त्या ग्रुपमध्ये मुस्ताफ खान रा. अचलपूर याने शैतान नावाच्या रेड्याचा फोटो टाकला होता. तेव्हा संजय रंगराव दुलांगे (रा. राजू नगर, नागपूर) याने ‘भीमा’ नावाच्या रेड्यासोबत टक्कर लावणार का, असा मेसेज या ग्रुपवर टाकला होता. तेव्हा त्याचा मालक मुस्तफाखान, रा. अचलपूर याचा पुतण्या अजीम खान याला फोन लावून रेड्यांच्या झुंजीबाबत विचारणा केली होती. यानंतर दोन्ही रेड्यांची झुंज लावण्याचे ठरले.
‘राजा’ ग्रुपमध्ये ठरल्याप्रमाणे १३ जून रोजी मंगल यादव (रा. मनीष नगर, नागपूर) यांच्या घरी अज्जू यादव रा. कामठी, पीयूष येवले, शुभम तिवारी दोघेही रा. नारी, भगवंत काळे, संजय दुलांगे, बंडू मायकलकर, मंगेश काकडे सर्व रा. राजू नगर हिंगणा यांची बैठक झाली. तिथे दोन्ही पक्षांच्या वतीने शर्यतीचे काही पैसे गोळा करण्यात आले. ठरल्याप्रमाणे १९ जून रोजी दुपारी दोन वाजता राऊळगाव शिवारातील झुडपी जंगलात रेड्यांची झुंज होणार होती.
त्यानुसार झुंज सुरू झाली असताना पोलिसांनी धाड टाकली. यात स्विफ्ट कार क्रमांक यु.पी.७०- एफ.यू.८६४१ (किंमत पाच लाख), ओम्नी कार क्रमांक एम.एच. २७, ए.सी.-५२८ (किंमत दीड लाख), स्वीफ्ट व्हिडीआय एम. एच.४०-बी.जे.-०७३२ (किंमत तीन लाख), स्विफ्ट कार क्रमांक एम.एच.४० सी.एच.-२२९८ (किंमत पाच लाख) असा एकूण २८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल तसेच दोन रेडे, रोख रक्कम व मोबाइल असा एकूण २९ लाख ८३ हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये १८ आरोपींना अटक करण्यात आली, तर दहा आरोपी फरार आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.