‘एजी एन्व्हायरो’वर लागेल लाखोंचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 10:30 PM2020-07-14T22:30:34+5:302020-07-14T22:32:07+5:30
कचऱ्याच्या गाडीत माती भरून भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये टाकत असल्याप्रकरणी मनपाने कारवाईची तयारी सुरू केली आहे. या प्रकरणात कचरा संकलन करणाऱ्या ‘एजी एन्व्हायरो’ कंपनीच्या महिन्याच्या बिलातून १० टक्के रक्कम दंडाच्या रूपात कपात करण्यात येईल. अप्पर आयुक्त राम जोशी यांनी प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल आयुक्त तुकाराम मुंढे यांना पाठविला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कचऱ्याच्या गाडीत माती भरून भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये टाकत असल्याप्रकरणी मनपाने कारवाईची तयारी सुरू केली आहे. या प्रकरणात कचरा संकलन करणाऱ्या ‘एजी एन्व्हायरो’ कंपनीच्या महिन्याच्या बिलातून १० टक्के रक्कम दंडाच्या रूपात कपात करण्यात येईल. अप्पर आयुक्त राम जोशी यांनी प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल आयुक्त तुकाराम मुंढे यांना पाठविला आहे. सूत्रांच्या मते, वारंवार येत असलेल्या तक्रारीवरून वरिष्ठ अधिकारी कंपनीवर दंड लावण्याच्या बाजूने आहे.
२८ जून रोजी आमदार विकास ठाकरे यांनी भांडेवाडी डम्पिंग यार्डच्या बाहेर मातीने भरलेल्या तीन कचरागाड्यांना पकडले. या प्रकरणात जोशी यांच्या अध्यक्षतेत चौकशी समिती गठित करण्यात आली. कंपनीने संबंधित गाडीच्या ड्रायव्हरविरुद्ध पोलिसात तक्रारदेखील करण्यात आली. जोशी यांनी या प्रकरणाची चौकशी केली. त्यानंतर दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. किती दंड आकारावा हा अधिकार आयुक्तांकडे असल्याने, कारवाईची फाईल त्यांच्याकडे पाठविण्यात आली आहे. आयुक्त यावर काय निर्णय घेतात, हे बघायचे आहे. जर दंड आकारण्यात आला तर झोन क्रमांक १ ते ५ मध्ये कचरा संकलनाचे काम बघणाऱ्या कंपनीवर २५ ते ३० लाख रुपये दंड आकारण्यात येऊ शकतो. दर महिन्याला कंपनीचे २.५ ते ३ कोटी रुपयांचे बिल निघते.
याबाबत अप्पर आयुक्त राम जोशी यांच्याशी संपर्क केला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. कार्यालयीन बैठकीत ते व्यस्त होते. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘एजी एन्व्हायरो’वर कारवाई होण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत ६० प्रकरणे आली समोर
भांडेवाडीतील वजनकाट्यावर ज्या वाहनात कचऱ्याबरोबर मातीही असेल, अशा वाहनांना यादीतून काढण्यात येते. असे ६० वाहन समोर आले आहे. ‘एजी एन्व्हायरो’ कंपनीबद्दल तक्रारीही वाढल्या आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने दंड आकारण्याबाबत शिफारस केली आहे. या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी काही महिन्यापूर्वी कंपनीकडून होत असलेल्या त्रासामुळे संपही पुकारला होता.