बंगालच्या रणधुमाळीत ‘एमआयएम’चीदेखील ‘एन्ट्री’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:08 AM2021-04-08T04:08:46+5:302021-04-08T04:08:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील निवडणुकीत ‘एआयएमआयएम’नेदेखील उडी घेतली आहे. पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील निवडणुकीत ‘एआयएमआयएम’नेदेखील उडी घेतली आहे. पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन औवैसी यांनी सात जागांवरील उमेदवार घोषित केले आहे. औवैसी यांच्या सभांना बुधवारपासून सुरुवात झाली व तीन दिवसात मुस्लिमबहुल मतदारसंघांमध्ये ते प्रचार करणार आहेत. ओवैसींच्या प्रचारामुळे तृणमूल काँग्रेससमोरील आव्हानांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
पश्चिम बंगाल निवडणुकांच्या रिंगणात ‘एआयएमआयएम’देखील उतरणार असल्याची घोषणा औवैसी यांनी केली आहे. मात्र उमेदवार किती राहतील, हे स्पष्ट केले नव्हते. चौथ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी पक्षाने सात जागांवरील उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. यात ईथर, जालंगी सीट, सागरदिघी, भरतपूर, मालतीपूर, रतुआ व आसनसोल उत्तर या जागांचा यात समावेश आहे.
अब्बास सिद्दीकी यांची ‘आयएसएफ’ बंगालमध्ये डावे पक्ष व काँग्रेससोबत निवडणुकीत असल्याने ओवैसी रिंगणात उडी घेणार नाही, असे दावे करण्यात येत होते. पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या ३० टक्क्यांहून अधिक आहे. अनेक जागांवर तर मुस्लिम मतदारांची टक्केवारी अर्ध्याहून अधिक आहे. ममता बॅनर्जी यांनीदेखील पुढील टप्प्यात मुस्लिम बांधवांनी तृणमूललाच मतदान करावे, असे आवाहन केले आहे. अशा स्थितीत ‘एआयएमआयएम’मुळे या सात जागांवर मुस्लिम मतांचे विभाजन होण्याची दाट शक्यता आहे व सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला त्याचा फटका बसू शकतो, असा अंदाज राजकीय जाणकारांनी वर्तविला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एमआयएम’ सातच जागांवर उमेदवार उतरविणार असून, इतर टप्प्यात त्यांचे उमेदवार राहणार नाही. मात्र याबाबत ‘एमआयएम’कडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
ओवैसींच्या सभेला नाकारली परवानगी
दरम्यान, औवैसी यांची भरतपूर येथे प्रचार सभा होती. मात्र ऐनवेळी प्रशासनाने सभेसाठी परवानगी नाकारली. त्यांचे हेलिकॉप्टरदेखील लँड होऊ दिले नाही. पक्षाने त्यांच्या बुधवारच्या सर्वच सभा रद्द केल्या.