मनात रुंजी घालणारा कार्यक्रम ‘गंध प्रीतीचा’
By Admin | Published: May 25, 2016 02:55 AM2016-05-25T02:55:11+5:302016-05-25T02:55:11+5:30
प्रेम हीच खरी शाश्वत भावना आहे. जगात मोठमोठ्या क्रांती प्रेमाच्या भरवशावर झाल्यात हा इतिहासही आहे.
राम गणेश गडकरी स्मृती प्रतिष्ठानचे आयोजन : १०० वर्षांतील प्रेमकवितांचे अभिवाचन
नागपूर : प्रेम हीच खरी शाश्वत भावना आहे. जगात मोठमोठ्या क्रांती प्रेमाच्या भरवशावर झाल्यात हा इतिहासही आहे. त्यामुळेच कदाचित जगातल्या कुठल्याही कवीला, कलावंताला प्रेम ही भावना कधीच टाळता आली नाही. किंबहुना ती टाळता येणे अशक्यच आहे. हळुवार मनात घर करणारी, विरहार्त व्याकुळ करणारी आणि हुरहुर लावणारी, आनंदी करणारी, आयुष्य बदलून टाकणारी आणि आयुष्य व्यापून उरणारी, प्रेमाचे दु:खही हळवे आणि सुखही टचकन डोळ्यात आनंदाश्रु आणणारे. माणूस कितीही पांडित्यपूर्ण आणि प्रगल्भतेचा आव आणणारा असला तरी प्रेम ही भावना त्यात असतेच. प्रेमाचे अनेक पदर असतात, पैलू असतात, अनेक नात्यांमध्ये प्रेमाच्या विविध छटाही असतात. प्रेमाच्या या सर्व पैलूंना स्पर्श करणारा अभिवाचनाचा आणि सुरेलतेचा स्पर्श असणारा कार्यक्रम ‘गंध प्रीतीचा’ रसिकांच्या आठवणीत राहणारा ठरला.
राम गणेश गडकरी स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने राम गणेश गडकरी यांच्या १३१ व्या जन्मदिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन साई सभागृह, शंकरनगर येथे करण्यात आले. याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्येष्ठ काँग्रेस नेते रणजीतबाबू देशमुख, गिरीश गांधी, डॉ. अविनाश रोडे प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाची भूमिका शुभदा फडणवीस यांनी सांगितली आणि कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे, अनुराधा मराठे आणि अभिनेते डॉ. गिरीश ओक यांचे अभिवाचन कवितांना अर्थप्रवाही करणारे होते. बालकराम या टोपण नावाने विनोदी लेखन करणारे आणि गोविंदाग्रज म्हणून कविता करणारे गडकरी म्हणजे अजब रसायन. या मनस्वी प्रतिभावंतांच्या गद्य आणि पद्य अभिवाचनाने कार्यक्रमात रंगत आणली. त्यांच्या नाटकातील पदे, संवाद आणि कवितांच्या सादरीकरणाने सुरू झालेला हा प्रवास शंभर वर्षांच्या प्रेमकवितेचा धांडोळा घेत मनात रुंजी घालत राहिला. गडकऱ्यांना प्रेमाचे शाहिर असे संबोधन लावले जाते. त्यामुळेच शंभर वर्षातील प्रेमकवितांना स्पर्श करताना केशवसूत, भा. रा. तांबे, उपाध्ये, बालकवी, रॉय किणीकर, बा. भ. बोरकर, कुसुमाग्रज, पद्मा शेळके, इंदिरा संत, वसंत बापट, शंकर वैद्य, सुरेश भट, दासु वैद्य, सुधीर मोघे, अरुण कोल्हटकर, पु. शी. रेगे, कवी अनिल, अरुणा ढेरे असा हा प्रवास आनंददायी झाला. याप्रसंगी अनुराधा मराठे यांनी काही कविता गेय स्वरुपात सादर करून रसिकांना आनंद दिला. (प्रतिनिधी)