मिनरलचे तुम्ही थंड पाणी पिता, ते शुद्ध आहे का? अन्न व औषध प्रशासन विभागाचे नियंत्रण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2023 09:48 PM2023-06-17T21:48:47+5:302023-06-17T21:49:14+5:30
Nagpur News कमी जागेत, कमी वेळात व कमी खर्चात मिनरल वॉटरच्या नावाखाली दूषित पाणी मशीनद्वारे थंड करून विक्री करण्याचा व्यवसाय सध्या जिल्ह्यात बराच वाढला आहे.
गडचिराेली : कमी जागेत, कमी वेळात व कमी खर्चात मिनरल वॉटरच्या नावाखाली दूषित पाणी मशीनद्वारे थंड करून विक्री करण्याचा व्यवसाय सध्या जिल्ह्यात बराच वाढला आहे. उन्हाळ्यात तर या पाण्याची उलाढाल लाखोंच्या घरात जाते. शुद्ध व थंड पाण्याचे फलक लावून हे अशुद्ध पाणी लोकांच्या गळी उतरवून त्यांच्या आरोग्याशी खेळ खेळले तर जात नाही ना, अशी शंका येत आहे. मात्र, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या यंत्रणेकडून तपासणी हाेत नसल्याने या व्यावसायिकांचे चांगलेच फावले आहे. या पिण्याच्या पाण्याची तपासणीदेखील होते की नाही, हादेखील संशोधनाचा विषय आहे.
जिल्ह्यात शहरांसह ग्रामीण भागात हा अशुद्ध व थंड पाणी विक्रीचा व्यवसाय चांगलाच फोफावला आहे. यावर प्रशासनाचेही नियंत्रण नसल्याने पाणी जार विक्रीची दुकाने गल्लीबोळात लावण्यात आली आहेत. कमी खर्चात, कमी जागेत व कमी वेळात बऱ्यापैकी उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून पाणी विक्रीकडे पाहिले जात आहे. सुरुवातीला शुद्धीकरणाचे प्लांट टाकून मिनरल वॉटरचे जार विकणारे मोजकेच व्यावसायिक होते; परंतु आता भूगर्भातील पाणी उपसून केवळ थंड करून विकण्याला जास्त खर्च लागत नसल्याने अशा पद्धतीने पाणी विक्रीचा व्यवसाय सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
कुठे आहेत प्रशासनाचे नियम?
कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी संबंधितांना ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा नगरपंचायतीची परवानगी घ्यावी लागते. सोबतच व्यवसायाचा परवानाही लागतो. परंतु, पाण्याचे जार विकण्यासाठी प्रशासनाकडून ना नियमावली लावण्यात आली, ना कोणतेही निर्बंध लावण्यात आले.
सर्वच कार्यक्रमांत पाेहोचताहेत कॅन
बोअरवेलद्वारे आलेले पाणी मशीनद्वारे थंड करून जारमध्ये भरले जाते. तो जार २५ ते ३० रुपयांमध्ये विकला जातो. नागरिकही दिवसेंदिवस या थंड पाण्याची मागणी करीत असल्याने सध्या पाणी विक्री जोरात आहे. विशेषतः विविध कार्यक्रम सोहळे, भागात विवाह समारंभ व इतर सार्वजनिक उत्सवांसह शासकीय, निमशासकीय कार्यालये, हॉटेल आणि दुकानांमध्येही आता जारमधील थंड पाणी वापरले जात असल्याने पाणी विक्रेत्यांची चांदी झाली आहे. उन्हाळ्यात नागरिकही आता पिण्यासाठी पाण्याचे जार मागवित असल्याचे दिसून येत आहे.