म्युकरमायकोसिसवरील किमान खर्च ८ लाख; शासनाची मदत केवळ दीड लाखांची !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 09:27 PM2021-05-20T21:27:13+5:302021-05-20T21:28:48+5:30
mucaremycosis treatment कोरोनाची साथ आटोक्यात येत असताना म्युकरमायकोसिसचे नवीन संकट ओढावले आहे. शासनाने महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत या आजाराला समाविष्ट केले असून १ लाख ५० हजार, तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत ५ लाख रुपये निश्चित केले आहे. परंतु या आजारात विविध विषयांतील विशेषज्ञ, औषधोपचार, शस्त्रक्रिया व रुग्णालयातील वास्तवाचा खर्चच किमान ८ लाखांवर जात असल्याने शासनाची ही मदत तोकडी पडत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाची साथ आटोक्यात येत असताना म्युकरमायकोसिसचे नवीन संकट ओढावले आहे. शासनाने महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत या आजाराला समाविष्ट केले असून १ लाख ५० हजार, तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत ५ लाख रुपये निश्चित केले आहे. परंतु या आजारात विविध विषयांतील विशेषज्ञ, औषधोपचार, शस्त्रक्रिया व रुग्णालयातील वास्तवाचा खर्चच किमान ८ लाखांवर जात असल्याने शासनाची ही मदत तोकडी पडत आहे. यामुळे जनआरोग्य योजनेत असलेल्या खासगी रुग्णालयांच्या अडचणी वाढल्या आहेत.
कोरोनातून बरे झालेल्या काही रुग्णांना ‘म्युकरमायकोसिस’ म्हणजे काळी बुरशी नावाच्या आजाराला समोर जावे लागत आहे. मेयो व मेडिकलमध्ये आतापर्यंत १३५ रुग्ण उपचारासाठी आले असून, यातील ५२ रुग्णांवर शस्त्रक्रिया, तर १५ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. सध्याच्या स्थितीत या दोन्ही रुग्णालये मिळून १०० रुग्ण उपचाराखाली आहेत. खासगी रुग्णालयात ३००वर रुग्ण असल्याचे सांगितले जाते. खासगी रुग्णालयातील उपचाराचा खर्च जनआरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांवर पडू नये यासाठी योजनेत समाविष्ट खासगी रुग्णालयांना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतून दीड लाखांचे दहा दिवसांचे ‘पॅकेज’ दिले आहे. परंतु बहुआयामी विशेषज्ञाची सेवांची पडत असलेली गरज, शस्त्रक्रिया, महागडी औषधी व रुग्णालयातील वास्तव आदींचा खर्चच एका रुग्णाला ८ ते १० लाख रुपये येत असताना दीड लाखात हा खर्च कसा भागवावा, असा प्रश्न खासगी रुग्णालयांना पडला आहे. सध्या जनआरोग्य योजनेत समाविष्ट असलेल्या ३८ खासगी रुग्णालयातून एकाही रुग्णालयात या योजनेतून उपचार सुरू नसल्याची माहिती आहे. यामुळे रुग्णांचा संपूर्ण भार मेयो, मेडिकलवर आला आहे.
उपचाराचा खर्च मोठा
म्युकरमायकोसिच्या रुग्णांना मायक्रोबायलॉजिस्ट, इंटर्नल मेडिसीन स्पेशालिस्ट, इन्टेन्सीव्हीस्ट, न्युरोलॉजिस्ट, ईएनटी स्पेशालिस्ट, ऑप्थेल्मोलॉजिस्ट, डेंटिस्ट, मॅक्सीलोफेशिअल किंवा प्लॅस्टिक सर्जन व बायोकेमिस्ट अशा विशेषज्ञांच्या सेवांची गरज पडते. यांच्याशी संबंधित शस्त्रक्रिया केल्या जातात. शिवाय, ‘लिपोसोमल अॅम्फोटीसिरीन-बी’ ‘५० एमजी’च्या एका इंजेक्शनची किंमत बाजारात ७,५०० रुपयांचे आहे. रुग्णाचा आजाराची गंभीरता पाहून दिवसाला जवळपास दोन ते चार इंजेक्शन दिले जातात. ‘पॉसॅकोनाझोल’ दहा गोळ्यांची किंमत पाच हजारांच्या घरात आहे. या शिवाय, इतरही औषधांचा खर्च आहेच. हा खर्च दीड लाखांत बसत नसल्याचे योजनेतील काही रुग्णालयांचे म्हणणे आहे. सध्यातरी एकाही खासगी रुग्णालयात या योजनेतून उपचार होत नाही आहे.
रुग्णांच्या नातेवाइकांची पैशासोबतच औषधांसाठी धावाधाव
सुरुवातील कोरोना आणि आता म्युकरमायकोसिसच्या खासगी रुग्णालयातील उपचारामुळे रुग्णाचे नातेवाईक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. एका नातेवाईकाने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले, धंतोली येथील एका खासगी रुग्णालयात म्युकरमायकोसिसवर रुग्ण उपचार घेत आहेत. रोजचा खर्चच जवळपास ५० हजारांवर जात आहे. जीव वाचविण्यासाठी उसनवारीवर पैसे घेतले आहे. यात रुग्णालयातून इंजेक्शन मिळत नसल्याने त्यासाठीही धावाधाव करण्याची वेळ आली आहे.
-म्युकरमायकोसिसचे जिल्ह्यातील रुग्ण : ४३५
-म्युकरमायकोसिसचे एकूण मृत्यू : १५