५० हजारांची लाच घेताना खाण व्यवस्थापकाला अटक, CBI ची पडली रेड
By योगेश पांडे | Updated: November 10, 2022 22:21 IST2022-11-10T22:11:19+5:302022-11-10T22:21:33+5:30
प्रत्यक्षात ग्रॅच्युईटी १७ ते १८ लाख रुपयेच निघते. मात्र मी ती रक्कम २० लाखांवर नेली अशी बतावणी करत धांडेने कर्मचाऱ्याकडून ५० हजारांची लाच मागितली.

५० हजारांची लाच घेताना खाण व्यवस्थापकाला अटक, CBI ची पडली रेड
योगेश पांडे
नागपूर : ग्रॅच्युइटीची रक्कम मंजुर केल्याच्या बदलात सेवानिवृत्त कर्मचाऱ्याकडून ५० हजारांची लाच मागणाऱ्या वेकोलिच्या खाण व्यवस्थापकाला सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली. चंद्रपूर येथील महाकाली खाण परिसरात ही कारवाई झाली. एस.एम.धांडे असे व्यवस्थापकाचे नाव आहे. संबंधित खाणीत कर्मचारी असलेला एक कर्मचारी ऑगस्ट महिन्यात सेवानिवृत्त झाला. त्याला ग्रॅच्युईटी म्हणून २० लाख रुपये मिळाले. तो धांडेच्या हाताखालीच काम करत होता.
प्रत्यक्षात ग्रॅच्युईटी १७ ते १८ लाख रुपयेच निघते. मात्र मी ती रक्कम २० लाखांवर नेली अशी बतावणी करत धांडेने कर्मचाऱ्याकडून ५० हजारांची लाच मागितली. संबंधित कर्मचाऱ्याला पैसे देण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे त्याने सीबीआयकडे यासंदर्भात तक्रार केली. सीबीआयने तक्रारीची चाचपणी केली. सीबीआयच्या ‘एसीबी’च्या पथकाने महाकाली खाण परिसरात सापळा रचला व लाच घेताना धांडेला रंगेहाथ अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सीबीआय ‘एसीबी’चे प्रमुख एम.एस.खान यांनी दिली. या कारवाईमुळे वेकोलिमध्ये खळबळ माजली आहे. सीबीआयच्या पथकाने धांडेला रंगेहाथ अटक केल्यानंतर त्याच्या निवासस्थानाची तसेच कार्यालयाची झडती घेतली. याशिवाय त्याच्याशी संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांचीदेखील विचारपूस करण्यात आली.