संजय राऊत यांच्यामुळे शिवसेनेवर अशी परिस्थिती आली; दीपक केसरकरांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 12:05 PM2023-12-14T12:05:03+5:302023-12-14T12:11:32+5:30
शिवसेनेतील आमदार अपात्रतेची सुनावणी सुरू आहे. ३१ डिसेंबर अपात्रतेचा निकाल देणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली.
नागपूर- शिवसेनेतील आमदार अपात्रतेची सुनावणी सुरू आहे. ३१ डिसेंबर पर्यंत अपात्रतेचा निकाल देणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. दरम्यान, आता शिवसेनेतील दोन्ही गटात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काल खासदार संजय राऊत यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्यावर जोरदार टीका केली, या टीकेला आज केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले.
मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडीतून निवडणूक लढवून दाखवावी,त्यांचे डिपॉझिट जप्त होईल, अशी टीका राऊत यांनी केली. यावर बोलताना दीपक केसरकर म्हणाले, संजय राऊत यांच्यामुळेच शिवसेनेची ही अशी वेळ आली आहे. मी ज्यावेळी शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा सेनेची १ लाख १० हजार मते वाढली. मी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलो, यावेळी मी युतीबाबत चर्चा केली होती. हीच गोष्टी त्यावेळी खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांना सांगितली होती, असा आरोपही मंत्री दीपक केसरकर यांनी केला.
महाराष्ट्रात लोकसभेला कोणाला किती जागा? चुरशीची लढत होणार, ताज्या सर्व्हेची अशी आहे आकडेवारी!
काल आमदार अनिल परब यांनी दीपक केसरकर यांच्यावर आरोप केले. परब म्हणाले, "आज सकाळी जी सुनावणी झाली त्या सुनावणीदरम्यान उलटतपासणीवेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी बाळासाहेबांबाबत जे उद्गार काढले, ते अतिशय संतापजनक होते. त्याचं कारण असं आहे की, बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहोत, असं सांगून त्यांनी गद्दारी केली आहे. मात्र आता ते असं म्हणत आहेत की, बाळासाहेबांनी लोकशाहीची कोणतीही तत्त्वे कधीही पाळली नाहीत, बाळासाहेब मनमानी करत होते. बाळासाहेबांनी निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे कोणत्याही निवडणुका घेतल्या नाहीत, असे आरोप केसरकरांनी उलटतपासणीवेळी केले आहेत.", असा आरोपही आमदार अनिल परब यांनी केला. या आरोपांना आज मंत्री केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मंत्री दीपक केसरकर म्हणाले, विधिमंडळात अध्यक्ष यांनी घेतलेली सुनावणी हा न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे. अनिल परब यांनी जे खोटे स्टेस्टमेंट दिले, हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे.मी अनिल परब यांच्याबाबत अध्यक्ष यांच्याकडे पत्र देणार आहे. न्याय मिळाला नाही तर आम्ही कोर्टात जाणार आहे, असंही केसरकर म्हणाले. मी बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत बोललो नाही. तरी अनिल परब बाहेर येऊन स्टेस्टमेंट देत आहेत, असा आरोपही केसरकर यांनी केला.