मंत्रिमहोदय, नंबरच बंद आहे, कुठे करायची तक्रार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:20 AM2020-12-04T04:20:42+5:302020-12-04T04:20:42+5:30
कमल शर्मा नागपूर : घरचा वीजपुरवठा बऱ्याच वेळापासून बंद पडलायं, आपण फार वैतागलेले आहोत. तक्रारीचे कसलेही साधन नाही. अखेर ...
कमल शर्मा
नागपूर : घरचा वीजपुरवठा बऱ्याच वेळापासून बंद पडलायं, आपण फार वैतागलेले आहोत. तक्रारीचे कसलेही साधन नाही. अखेर आपण महावितरणच्या वेबसाईटवर जातो. तिथे ठळकपणे दिलेले संपर्क क्रमांक पाहून आपण भलतेच खुश होतो. फोन लावतो, मात्र पलीकडून ऐकायला मिळते, ‘या क्रमांकाची इनकमिंग सेवा बंद करण्यात आली आहे.’ ऐकून आपले अवसान गळते, गप्प बसण्याशिवाय दुसरे असते तरी काय?
हा प्रकार आहे महावितरणचा ! आश्चर्य म्हणजे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या आदेशावरूनच हे संपर्क क्रमांक वेबसाईटवर टाकलेले आहेत. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन त्यांनी महावितरणला हे दोन क्रमांक उपलब्ध करून दिले होते. यातील एक लॅण्डलाईनचा क्रमांक (०२२-४१०७८५००) आहे. वीज गेल्यावर मिस कॉल देऊन या क्रमांकावर तक्रार दाखल करण्याचे महावितरणचेच आवाहन आहे. मात्र त्यावर इनकमिंग कॉल बंद असल्याची माहिती मिळते. याच प्रकारे ९९३०३९९३०३ या क्रमांकावर एसएमएस करण्याचेही आवाहन आहे. मात्र एमएसएम पाठविल्यावर कसलाही प्रतिसाद मिळत नाही. संपर्क सेवाही बंद आहे.
...
बिल न भरल्याने सेवा खंडित
महावितरणचे अधिकारी या संदर्भात काहीच सांगत नाहीत. मात्र, मोबाईल आणि टेलिफोनचे बिल न भरल्याने ही सेवा खंडित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यापूर्वी तर तक्रारकर्त्यांच्या वारंवार येणाऱ्या कॉलचा त्रास वाचविण्यासाठी मुद्दामहून इनकमिंग कॉल बंद करून ठेवण्यात येत असल्याचा प्रकार घडत होता.
...
सेवा बंद असतानाही वेबसाईटवर नंबर कशाला?
महावितरणचे कार्यकारी संचालक (बिलिंग) उदय गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही सेवा लॉकडाऊनच्या प्रारंभाला दिली होती. फक्त वाणिज्य आणि औद्योगिक सेवा असणाऱ्या ग्राहकांसाठी हे क्रमांक उपलब्ध होते. मात्र आता ही सेवा बंद आहे. त्यामुळे सेवा बंद असताना वेबसाईटवर संपर्क क्रमांक ठेवलेच कशाला, असा मुद्दा उपस्थित होणे स्वाभाविक आहे. हे क्रमांक घरगुती ग्राहकांसाठी नसल्याचेही महावितरणने लिहिलेले नाही. अशा वेळी नागरिकांनी तक्रार करायची तरी कोणत्या क्रमांकावर, हे आता वीजमंत्र्यांनाच विचारायची वेळ आली आहे.