ग्रीन बसमधून मंत्री व आमदारांनी प्रवास करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 10:52 AM2018-07-02T10:52:23+5:302018-07-02T10:54:29+5:30
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन कालावधीत मंत्री, आमदारांनी व अधिकाऱ्यांनी या बसमधून प्रवास करून सकारात्मक संदेश द्यावा, अशा आशयाचे पत्र परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पर्यावरण संवर्धनासाठी महापालिकेने ग्रीन बसेस चालविण्याचा निर्णय घेतला. परंतु ग्रीन बसला प्रवाशांचा प्रतिसाद नाही. ही सेवा तोट्यात चालवावी लागत आहे. तिकीट दर कमी करूनही उपयोग झालेला नाही. इथेनॉलवर चालणाऱ्या या बसला नागरिकांचा प्रतिसाद मिळावा यासाठी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन कालावधीत मंत्री, आमदारांनी व अधिकाऱ्यांनी या बसमधून प्रवास करून सकारात्मक संदेश द्यावा, अशा आशयाचे पत्र परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे.
५ डिसेंबर २०१६ पासून महापालिका परिवहन विभागाच्या माध्यमातून आपली बस सेवा संचालित करीत आहे. शहरात डिझेलवरील ३०० हून अधिक बसेस धावतात तर इथेनॉलवर २५ ग्रीन बसेस चालविल्या जात आहेत. अधिवेशन कालावधीत मंत्री, आमदार व अधिकाऱ्यांनी ग्रीन बसमधून प्रवास केला तर नागरिकांत सकारात्मक संदेश जाईल. याला शासनाने अनुमती दिल्यास रविभवन, हैदराबाद हाऊ स, आमदार निवास व विधानभवन परिसरातून या बसेसची व्यवस्था क रण्यात येईल. खासगी टॅक्सीऐवजी या बसेस चांगला पर्याय होईल, असेही पत्रात नमूद केले आहे. दरम्यान, महापालिकेतील अनेक पदाधिकारी, नगरसेवक ग्रीन बसच्या फेऱ्या असलेल्या मार्गावर वास्तव्यास आहेत.
परंतु ते महापालिका मुख्यालयात येण्यासाठी ग्रीन बसचा वापर करीत नाही. यादृष्टीने प्रयत्नही होत नाही. अधिवेशन आले की अनेकांना नवनवीन कल्पना सुचतात. अशातलाच हा प्रकार असल्याची प्रतिक्रिया परिवहन समितीच्या काही सदस्यांनी व्यक्त केली.