वैतागलेल्या शेतमालकाकडून मंत्र्यांच्या पीएंची झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:08 AM2021-07-17T04:08:34+5:302021-07-17T04:08:34+5:30
नरेश डोंगरे । लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शासनाने अधिग्रहित केलेल्या शेतजमिनीसंदर्भातील वादात न्याय मिळत नसल्याची भावना झाल्याने ...
नरेश डोंगरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासनाने अधिग्रहित केलेल्या शेतजमिनीसंदर्भातील वादात न्याय मिळत नसल्याची भावना झाल्याने थेट मंत्रालय उडवून देण्याचा फोन करणाऱ्या व्यक्तीने आता मंत्र्यांच्या पीएंना टार्गेट केले आहे. आपल्या प्रकरणाचे काय झाले, अशी विचारणा करून या व्यक्तीने मंत्र्यांच्या पीएंची झाडाझडती घेणे सुरू केल्याने काही जणांनी त्याचा चांगलाच धसका घेतला आहे. दरम्यान, संबंधित व्यक्ती तीव्र भाषेत खडे बोल सुनावत असल्याने कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पीएंनी येथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार वजा गाऱ्हाणे मांडले आहे.
नागपूर जिल्ह्यातील उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका छोट्याशा गावात राहणारी ही व्यक्ती दिव्यांग आहे. त्यांच्या तक्रार वजा गाऱ्हाण्यानुसार, मकरधोकडा येथे त्यांची शेतजमीन होती. १९९६ मध्ये शासनाने (वेकोली) ती अधिग्रहित केली. परंतु त्याचा आपल्याला योग्य मोबदला मिळाला नाही, अशी भावना झाल्यामुळे दिव्यांग असूनही ही व्यक्ती गेल्या २४ वर्षांपासून शासनासोबत पत्रव्यवहाराच्या माध्यमातून सनदशीर मार्गाने लढत आहे. कुठूनच न्याय मिळत नसल्यामुळे प्रचंड नैराश्य आल्यामुळे त्यांनी ३० मे रोजी मंत्रालयात बॉम्ब पेरल्याचा आणि मंत्रालय उडवून देण्याचा फोन केला होता. या फोनने राज्यभरात खळबळ उडवून दिली होती आणि त्याची नंतर प्रदीर्घ चाैकशीही झाली होती. त्यावेळी त्यांची अधिकारी आणि नेतेमंडळींनी समजूत काढली होती. तुम्हाला न्याय मिळेल, असेही म्हटले होते. आता दीड-दोन महिने होऊनही कसलाही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी विविध मंत्र्यांना (पीएंना) फोन करून आपल्या कामाचे काय झाले, अशी थेट विचारणा सुरू केली आहे. ‘गोडबोले’ उत्तर ऐकून समाधान होत नसल्याने त्यांनी खडे बोल सुनावणे सुरू केले आहे.
राज्याचे खार जमिनी विकास आणि भूकंप पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या एका पीएला त्यांनी अक्षरश: धारेवर धरले आहे. धारदार भाषेचा वापर होत असल्याने पीएंनी येथील शीर्षस्थ पोलीस अधिकाऱ्यांकडे गाऱ्हाणे मांडले आहे.
---
पोलिसांसमोरही पेच
संबंधित व्यक्ती फोनवर तीव्र भाषेत आपल्या भावना व्यक्त करीत आहे. त्यामुळे टेक्निकली हा गुन्हा ठरत नाही. मात्र, कॅबिनेट मंत्र्यांचे पीए असल्यामुळे या प्रकरणात काय आणि कशी कारवाई करावी, असा प्रश्न येथील पोलीस अधिकाऱ्यांना पडला आहे. तूर्त, संबंधित व्यक्तीला ‘समज’ देण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे.
----