कीटकनाशकांमुळे झालेल्या मृत्यूप्रकरणी कृषी मंत्रालय दोषी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 11:59 PM2017-10-23T23:59:03+5:302017-10-23T23:59:24+5:30
कीटकनाशकांच्या फवारणीमुळे विदर्भातील शेतकºयांच्या मृत्यूप्रकरणी राजकारण तापले असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शासनावर टीकास्त्र सोडले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कीटकनाशकांच्या फवारणीमुळे विदर्भातील शेतकºयांच्या मृत्यूप्रकरणी राजकारण तापले असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शासनावर टीकास्त्र सोडले आहे. प्रशासकीय परवानगीशिवाय कुठलेही कीटकनाशक बाजारात येऊच शकत नाही. या प्रकरणात कृषी मंत्रालयच दोषी असल्याचा आरोप करत संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कठोर कारवाई व्हावी, असे प्रतिपादन त्यांनी केले.
अमरावती येथील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शरद पवार सोमवारी सकाळच्या सुमारास नागपूर विमानतळावर पोहोचले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कीटकनाशक नियंत्रणासाठी कायदा आहे व वापरासाठी स्वतंत्र संशोधन संस्थादेखील आहे. संस्थेच्या मान्यतेशिवाय कुठलेही कीटकनाशक बाजारात येऊ शकत नाही. आम्ही आमच्या कार्यकाळात नियमांचे काटेकोरपणे पालन केले. गेल्या तीन वर्षात काय झाले माहीत नाही. या प्रकरणात संबंधित दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. आमच्या काळात जे नियमांचे उल्लंघन करून विक्री करायचे, त्यांच्यावर आम्ही कठोर कारवाई केली होती, अशी आठवण त्यांनी करून दिली.
राज्यात शेतकºयांची कर्जमाफी करण्यात आली. मात्र ही कर्जमाफी नियोजनशून्य असल्याचे दिसून येत आहे. कर्ज न घेतलेल्या शेतकºयांना पत्रे आली. सुधारणा करण्यासाठी शासनाला १५ दिवसांचा वेळ देऊ, नाहीतर पुढील दिशा ठरवू, असा इशाराही शरद पवार यांनी यावेळी दिला. दरम्यान, यावेळी शरद पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वादावर काहीच भाष्य करणार नसल्याचे सांगितले.
नियमात अडकून न पडता शेतकºयांना मदत करा
परतीच्या पावसामुळे विदर्भात सोयाबीन आणि कापूस पिकाचे नुकसान झाले आहे . केंद्र व राज्य शासनाने नियमात अडकून न पडता शेतकºयांना मदत केली पाहिजे . यासंदर्भात राज्य शासनाशी बोलणार असल्याचंही शरद पवार यांनी सांगितले.