मंत्रालयात माहिती पाठविणे थांबले
By admin | Published: August 5, 2014 01:04 AM2014-08-05T01:04:14+5:302014-08-05T01:04:14+5:30
महसूल कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपाचे परिणाम नागपूर जिल्ह्यात जाणवू लागले आहे. संपकाळात मुंबईला मंत्रालयात माहिती पाठविण्याचे काम पूर्णपणे ठप्प पडले आहे. कास्ट्राईबसह इतरही संघटनांनी
संपाचा चौथा दिवस : आंदोलन अधिक तीव्र होणार
नागपूर : महसूल कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपाचे परिणाम नागपूर जिल्ह्यात जाणवू लागले आहे. संपकाळात मुंबईला मंत्रालयात माहिती पाठविण्याचे काम पूर्णपणे ठप्प पडले आहे. कास्ट्राईबसह इतरही संघटनांनी संपाला पाठिंबा जाहीर केल्याने पुढच्या काळात आंंदोलन अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळाले आहे.
१ आॅगस्टपासून संपाला सुरुवात झाली. सोमवारी संपाचा चौथा दिवस होता. संपामुळे जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय, तहसील कार्यालयातील लिपिक पातळीवर होणारे सर्व कामकाज ठप्प पडले आहे. चार दिवसांपासून जिल्हापातळीवरून मंत्रालय, विभागपातळीवर माहिती पाठविण्याचे काम पूर्णपणे थांबले आहे. त्याची झळ अधिकाऱ्यांनाही बसू लागली आहे. सोमवारी आठवड्याचा पहिला दिवस असतानाही जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागात सामसूम होती. कर्मचारी प्रवेशद्वारावर आंदोलनस्थळी एकत्र आले होते. महत्त्वाच्या कामासाठी तरी मदत करा, अशी विनंती अधिकारी कर्मचाऱ्यांना करीत होते. अधिकाऱ्यांची अडचण समजून कर्मचाऱ्यारीही मदत करीत होते. सेतू कार्यालयातील महसूल कर्मचारी संपावर आहेत. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये, अशी कर्मचाऱ्यांची भूमिका आहे. त्यामुळे तातडीचे प्रमाणपत्र काढून देण्यात येत आहे. असे असले तरी सर्वच विभागातील दैनंदिन कामकाज ठप्प आहे.चौथ्या दिवशीही संपावर जाणाऱ्या कर्मचाऱ्याचे प्रमाण ९० टक्के पेक्षा अधिक होते. विशेषत: महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग लक्षणीय होता.
शासनाने संपाची दखल घेऊन तातडीने तोडगा काढावा अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा, संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश जोशी, सरचिटणीस प्रमोद बेले, उपाध्यक्ष ईश्वर बुधे, गोपाल इटनकर, संजय निलावार, मंगशे जाधव, नाना कडवे, श्याम गोसावी, मालती पराते, सुनीती नंद, दिनेश तिजारे, संजय शेंडे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)