दुचाकीची हाैस भागविण्यासाठी अल्पवयीन मुलगा बनला चोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2022 01:24 PM2022-04-19T13:24:53+5:302022-04-19T18:26:16+5:30
चाैकशीत त्याने होंडा शाईन आणि सीडी डॉन अशी दोन वाहने चोरल्याची कबुली दिली.
नागपूर : आपल्या समवयस्क मित्रांकडे दुचाक्या आहेत. आपण मात्र परिस्थितीमुळे दुचाकी विकत घेऊन चालवू शकत नाही, अशी खंत असल्याने एक अल्पवयीन मुलगा दुचाकी चोर बनला. वाठोडा पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या चाैकशीतून ही माहिती पुढे आली.
कृशक काॅलनी वाठोडा येथील हेमंतकुमार उमराव सोहलिया (वय ३२) यांची दुचाकी ४ एप्रिलला दुपारी चोरीस गेली होती. वाठोडा पोलीस या गुन्ह्याचा तपास करीत असताना १६ एप्रिलला त्यांना राऊतनगर परिसरात एक मुलगा दुचाकीवर जाताना दिसला. पोलिसांना बघून तो घाईगडबडीत निघाल्याने संशय वाढल्यामुळे पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. चाैकशीत त्याने होंडा शाईन आणि सीडी डॉन अशी दोन वाहने चोरल्याची कबुली दिली. स्वत:ची दुचाकी नसल्याने शाैक भागविण्यासाठी आपण दुचाकी चोरल्याची कबुली त्याने दिली. ठाणेदार आशालता खापरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही वाहने जप्त करून दुचाकी चोराची सुधारगृहात रवानगी केली.
अशाच प्रकारे जरीपटका पोलिसांनीही एका चोरट्याला अटक करून त्याच्याकडून चोरलेली हिरो होंडा पॅशन प्रो ही दुचाकी जप्त केली. शंकर महादेव हांडे (वय ३७, रा. हनी सोसायटी पांजरा, कोराडी) यांची ही दुचाकी आहे. ती १५ एप्रिलला सायंकाळी जरीपटक्यातील कडबी चाैक मेट्रो स्टेशनजवळून चोरीला गेली होती. हांडे यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी भानुदास वासुदेव बागडे (वय ३४, रा. ज्ञानेश्वर कॉलनी, मानकापूर) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून हांडे यांची दुचाकीही जप्त केली.