अत्याचाराच्या घटनेनंतर अल्पवयीन मुलीचा विनयभंग
By admin | Published: January 21, 2017 02:42 AM2017-01-21T02:42:10+5:302017-01-21T02:42:10+5:30
रेल्वेत एका अल्पवयीन मुलीची फसवणूक करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या एका आरोपीस आणि त्याला सहकार्य करणाऱ्या मित्राला गुरुवारी लोहमार्ग पोलिसांनी अटक केली होती.
गुन्हा दाखल : नागपूर लोहमार्ग पोलिसांकडे तपास
नागपूर : रेल्वेत एका अल्पवयीन मुलीची फसवणूक करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या एका आरोपीस आणि त्याला सहकार्य करणाऱ्या मित्राला गुरुवारी लोहमार्ग पोलिसांनी अटक केली होती. ही घटना ताजी असतानाच दुसऱ्याच दिवशी विदर्भ एक्स्प्रेसमध्ये एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी एका अनोळखी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गुरुवारी सायंकाळी ५ वाजता विदर्भ एक्स्प्रेस नागपूर रेल्वेस्थानकावर आली. या गाडीत एक महिला आणि तिची १२ वर्षाची अल्पवयीन मुलगी जनरल कोचमध्ये अकोल्याला जाण्यासाठी बसल्या. याच कोचमध्ये एक अनोळखी युवक होता. बसण्यावरून संबंधित महिला आणि त्या युवकाची बाचाबाची झाली. नागपुरातून गाडी सुटल्यानंतर खापरी ते बुटीबोरी दरम्यान संबंधित युवकाने या महिलेच्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला. मुलीने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर महिलेने या युवकाची चांगलीच खरडपट्टी काढली. अकोला रेल्वेस्थानक आल्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्याची धमकीही दिली. सहप्रवाशांनीही या युवकाची कानउघाडणी केली. त्यानंतर कारवाईच्या धास्तीने हा युवक मध्येच कोणत्यातरी रेल्वेस्थानकावर उतरला. अकोल्याला विदर्भ एक्स्प्रेस पोहोचल्यानंतर संबंधित महिलेने अज्ञात युवकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी विदर्भ एक्स्प्रेसच्या जनरल कोचची तपासणी केली असता त्यात एक अनोळखी बॅग सापडली. ही बॅग त्याच युवकाची असेल अशी शंका आल्यामुळे बॅगमधील कागदपत्रांवरून लोहमार्ग पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
अकोला लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून घटनास्थळ नागपूर लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत असल्यामुळे हे प्रकरण नागपूरला पाठविले आहे. लोहमार्ग पोलीस निरीक्षक अभय पान्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)