अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीला जन्मठेपेची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:28 AM2018-07-28T00:28:45+5:302018-07-28T00:30:27+5:30
सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम आरोपीला जन्मठेप व ६० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश डी. पी. सुराणा यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम आरोपीला जन्मठेप व ६० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश डी. पी. सुराणा यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला.
चंद्रशेखर रामदास तभाने (४४) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना मानकापूर पोलिसांच्या हद्दीतील आहे. घटनेच्या वेळी पीडित मुलगी १४ वर्षे वयाची होती. १ एप्रिल २०१५ ते १ जुलै २०१५ या काळात आरोपीने मुलीवर बलात्कार केला. त्यामुळे तिला गर्भधारणा झाली. गर्भ सात महिन्यांचा झाल्यानंतर आरोपीचे कुकृत्य प्रकाशात आले. तक्रारीनंतर मानकापूर पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक वाय. आर. श्रीखंडे यांनी प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सरकारतर्फे अॅड. कल्पना पांडे यांनी बाजू मांडली.