छत्तीसगडच्या बालसुधारगृहातून पळून गेलेल्या अल्पवयीन मुली नागपुरमध्ये ताब्यात
By योगेश पांडे | Published: July 7, 2024 10:34 PM2024-07-07T22:34:59+5:302024-07-07T22:35:37+5:30
महिला वॉर्डन, पोलिसांना बंद करून काढला होता पळ; बिना नंबर प्लेटच्या दुचाकीमुळे गवसल्या अल्पवयीन आरोपी
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: छत्तीसगडमधील राजनांदगाव येथील बालसुधारगृहातील महिला वॉर्डन आणि पोलिस कर्मचाऱ्यांना एका खोलीत बंद करून फरार झालेल्या तीन अल्पवयीन मुलींना नागपुरातून ताब्यात घेण्यात आले आहे. यातील दोघींवर खुनाचा गुन्हा दाखल आहे. नागपुरातील दोन महिला वाहतूक पोलिसांच्या समयसूचकतेमुळे तिघी ताब्यात येऊ शकल्या.
तीनही आरोपी छत्तीसगडमधीलच रहिवासी आहेत. एकीने भावाचा खून केला होता तर दुसरीने प्रियकराच्या मदतीने हत्या केली होती. तिसरीवर दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. तिघींनाही राजनांदगाव येथील महिला बालगृहात ठेवण्यात आले होते. ५जुलै रोजी संध्याकाळी पावणेआठ वाजताच्या सुमारास त्यांनी खोलीत आग लागल्याची माहिती लेडी वॉर्डनला दिली. लेडी वॉर्डन आणि महिला पोलीस कर्मचारी खोलीत पोहोचताच सुधारगृहातील एका खोलीत कोंडून तिघींनीही पळ काढला.
फरार होण्याअगोदर त्यांनी मोबाईल व रोख रक्कम लुटली. तसेच दुचाकीदेखील सोबत घेतली. राजनांदगाव येथील बसंतपूर पोलिसांनी घटनेची नोंद करून तपास सुरू केला. तिघीही दुचाकीने नागपूरला निघाले. त्यांनी रस्त्यात दुचाकीची नंबर प्लेटही काढली. तिघीही शनिवारी दुपारी नागपूरला पोहोचल्या.
वाहतूक शाखेच्या हवालदार वैशाली दुरुगकर आणि पूजा पुरी या वर्धमान नगर चौकात ड्युटीवर तैनात होत्या. त्यांची नजर ट्रिपल सीट जाणाऱ्या त्या मुलींवर पडली. दुचाकीला नंबर प्लेट नसल्याने महिला कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवले व कागदपत्रे मागितली. महिला कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी मुलींनी त्यांना पैसे देण्याचा प्रयत्न केला. अल्पवयीन मुलींच्या संभाषणावरून त्या छत्तीसगडमधील असल्याचा पोलिसांना संशय आला. डिक्की तपासली असता त्यात कपडे व इतर वस्तू दिसल्याने महिला कर्मचाऱ्यांचा संशय बळावला. महिला कर्मचाऱ्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने अल्पवयीन मुलींना कार्यालयात आणले व चौकशी केली असता त्या बालसुधारगृहातून पळून गेल्याचे समजले. घटनेची माहिती तात्काळ राजनांदगाव पोलिसांना देण्यात आली. त्यांनी नागपूर गाठून अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतले.