मिहानमध्ये छोट्या विमानांची देखभाल-दुरुस्ती
By Admin | Published: April 1, 2016 03:23 AM2016-04-01T03:23:25+5:302016-04-01T03:23:25+5:30
मिहान प्रकल्पात एअर इंडियाच्या एमआरओनंतर आता छोट्या विमानांची देखभाल, दुरुस्ती व उपकरण तयार करणाऱ्या कंपन्यासुद्धा आपले पाऊल पुढे टाकत आहे.
इंडामेर व मॅक्स एअरोस्पेस सुरूकरणार काम : चार एकर जागा घेतली
नागपूर : मिहान प्रकल्पात एअर इंडियाच्या एमआरओनंतर आता छोट्या विमानांची देखभाल, दुरुस्ती व उपकरण तयार करणाऱ्या कंपन्यासुद्धा आपले पाऊल पुढे टाकत आहे. यापूर्वी जागा घेऊनही बांधकाम सुरू न करणाऱ्या कंपन्या आता त्याच जागेवर कामाला सुरुवात करू शकतात. यात इंडामेर आणि मॅक्स एअरोस्पेस या कंपन्यांचा समावेश आहे.
इंडामेर व मॅक्स एअरोस्पेस या दोन्ही कंपन्यांनी मिहानमध्ये प्रत्येकी ४ एकर जागा घेतली आहे. यात इंडामेर छोटे प्रायव्हेट जेटच्या देखभाल दुरुस्तीचे काम पाहते. मॅक्स एअरोस्पेसने यापूर्वी १५ एकर जागा घेतली होती. यासाठी कंपनीने २० टक्के रक्कम सुद्धा भरली आहे. परंतु आता त्या कंपनीने मिहानमध्ये केवळ लहान विमानांच्या इंजिनच्या दुरुस्तीसाठी ४ एकर जागेत एमआरओ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. हे काम मॅक्स एअरोस्पेस अंतर्गत दुसरी कंपनी करणार आहे.
गेल्या वर्षी रिलायन्स एअरो स्ट्रक्चर्सतर्फे मिहानमध्ये जागा घेतल्यानंतर या कंपन्यांनी सुद्धा बांधकामाची तयारी सुरू केली आहे. रिलायन्स एअरो स्ट्रक्चर्सने मिहानमध्ये १०४ एकर जागा घेतली आहे. परंतु बांधकाम सुरू करण्याबाबत मात्र सध्या कुठलीही तयारी स्पष्ट झालेली नाही.
या कंपनीने मिहानमध्ये हेलिकॉप्टर व सेनेच्या विमानांना लागणारे उपकरण तयार करण्यासाठी जागा घेतली आहे. (प्रतिनिधी)