आईवडिलांच्या भांडणात मुलींचे जीवन उद्ध्वस्त; एकीने लावला गळफास, दुसरीने पिले फिनाईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2022 04:43 PM2022-05-23T16:43:21+5:302022-05-23T17:12:43+5:30
आईवडिलांच्या सततच्या भांडणामुळे त्रस्त झालेल्या मुलींनी टोकाचं पाऊल उचललं. मोठ्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर, तिच्या आत्महत्येची माहिती मिळताच लहान मुलीनेही फिनाईल पिऊन स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला.
नागपूर : घरातील भांडणांचा मुलांच्या आयुष्यावर विपरित परिणाम होतो. नागपुरातही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईवडिलांच्या भांडणामुळे त्रस्त होऊन अल्पवयीन विद्यार्थिनीने गळफास घेतला. तर दुसऱ्या बहिणीने फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी सकाळी मानकापूरच्या गोरेवाडा परिसरात घडली.
साक्षी अमरीतलाल तिवारी (१६) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. तिवारी खासगी कंपनीत काम करतो. त्याला मुलगी साक्षी (१६), शिवांगी (१५) आणि मुलगा असल्याचे सांगण्यात येत आहे. तिवारीचा नेहमीच पत्नीशी वाद होत होता. या वादामुळे साक्षी दु:खी होती. रविवारी सकाळी तिवारी मुलाला घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी गेले होते. पत्नी बाहेर गेली होती. साक्षी आणि शिवांगी घरी होत्या.
सकाळी १०.४५ वाजता शिवांगी अंघोळीसाठी गेली. यावेळी साक्षीने खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. अंघोळ करून परतल्यानंतर शिवांगीला बहीण फासावर लटकलेल्या अवस्थेत दिसली. साक्षीच्या आत्महत्येमुळे शिवांगी खचली. तिने सुसाईट नोट लिहून आईवडिलांचे रोज भांडण होते, कालही भांडण झाले होते. यामुळे साक्षी दु:खी होती. ताई मी तुझ्यावर खूप प्रेम करते. मी सुद्धा तुझ्यासोबत येत आहे, असे लिहून शिवांगीने फिनाईल प्राशन केले.
यानंतर शिवांगीने शेजाऱ्यांना साक्षीने आत्महत्या केल्याची माहिती दिली. शेजाऱ्यांनी साक्षीच्या घरी जाऊन पोलिसांना सूचना दिली. दरम्यान शिवांगीलाही उलट्या होणे सुरू झाले. शेजाऱ्यांना संशय आला. त्यानंतर शिवांगीने फिनाईल पिल्याचे सांगितले. तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिचा जीवन-मृत्यूशी संघर्ष सुरू आहे. साक्षी दहावीची विद्यार्थिनी होती तर शिवांगी नववीत शिकत आहे. मानकापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.