अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचे परदेशातील उच्च शिक्षणाचे स्वप्न भंगणार
By आनंद डेकाटे | Updated: September 16, 2024 17:23 IST2024-09-16T17:22:06+5:302024-09-16T17:23:46+5:30
Nagpur : शिष्यवृत्तीची अंतिम यादी अद्याप जाहीर नाही

Minority students' dreams of higher education abroad will be shattered
नागपूर : अल्पसंख्यांक परदेश शिष्यवृत्तीची यादी अजूनही जाहीर झालेली नाही. शिष्यवृत्ती मंजूर झाल्यानंतरची पुढील प्रक्रिया एक महिन्याची असते. काही विद्यापीठातील शैक्षणिक शुल्क भरण्याची तारीख सुद्धा निघून गेली आहे. अशा परिस्थितीत यादीच जाहीर न झाल्याने अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे परदेशातील उच्च शिक्षणाचे स्वप्न भंगणार असल्याचे दिसून येते.
अल्पसंख्याक परदेश शिष्यवृत्ती अंतर्गत ७५ विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी राज्य शासनाद्वारे देण्यात आली आहे. अल्पसंख्याक परदेश शिष्यवृत्ती २०२४-२५ साठी २१ ऑगस्ट २०२४ रोजी अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज जमा करण्याचा शेवटची तारीख ६ सप्टेंबर होती. जवळपास ६० विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज केले होते. अर्जदार विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थ्यांचे परदेशातील अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. तर काहींचे लवकरच सुरू होणार आहेत. विशेषतः यूकेतील विद्यापीठांसाठी १५ सप्टेंबर ही शैक्षणिक शुल्क भरण्याची अंतिम तारीख होती. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाल्यानंतरची पुढील प्रक्रिया जवळपास एक महिन्याची असते. तरी वेळेत अंतिम यादी जाहीर न झाल्यास विद्यार्थी प्रवेशापासून वंचित होतील व त्यांचे परदेशातील उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होणार नाही.
प्रक्रिया वेळेवर पूर्ण न झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होण्याची जास्त शक्यता आहे. नुकतेच काही विद्यार्थी जे अल्पसंख्याक परदेश शिष्यवृत्ती २०२४-२५ साठी पात्र होते ज्यांनी अर्ज केला होता ते विद्यापीठाचा अंतिम दिनांक निघून गेल्यामुळे वंचित झालेले आहेत. पुढेही काही दिवसांत आणखी विद्यार्थी परदेशातील उच्च शिक्षणापासून वंचित होण्याची शक्यता आहे.
"प्रक्रियेला अगोदरच खूप उशीर झालेला असून अल्पसंख्यांक विभागाने तसेच समाज कल्याण अयुक्त यांनी तत्काळ दखल घेऊन पात्र विद्यार्थ्यांचे परदेशातील उच्च शिक्षणाचे नुकसान टाळावे."
- आशिष फुलझेले सचिव, मानव अधिकार संरक्षण मंच